वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जवळपास तीन दशकांपूर्वी सौदी अरेबिया या देशात हत्या करणाऱ्या एका आरोपीला सीबीआयने तब्बल 26 वर्षांच्या प्रयत्नांनंतर अटक केली आहे. आरोपीचे नाव मोहम्मद दिलशाद असे आहे. गेली सव्वीस वर्षे या आरोपीने बनावट ओळखपत्रांच्या साहाय्याने तपास यंत्रणांना गुंगारा दिला होता. सीबीआयने या आरोपीचा शोध अनेक देशांमध्ये घेतला होता, अशी माहिती देण्यात आली.
साधारणत: 28 वर्षांपूर्वी दिलशाद हा सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे मोटर मॅकॅनिक आणि सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होता. त्याने आपल्या एका सहकाऱ्याचा कामावर असताना खून केला. त्यानंतर तो त्वरित भारतात परतला आणि बेपत्ता झाला. सौदी अरेबिया प्रशासनाच्या माहितीवरुन भारतातील तपास यंत्रणा त्याचा शोध घेत होत्या. तथापि, त्याने अनेक ओळखपत्रे बनवून घेतली होती. त्यामुळे त्याचा शोध घेणे जटील बनले होते. बनावट पासपोर्टच्या माध्यमातून त्याने विदेशांमध्येही संचार केला होता. तथापि, त्याला पकडण्यात अपयश आले होते. मात्र गेल्या गुरुवारी त्याला दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली. तो मदीनाहून दिल्लीला आला होता. त्याला आता न्यायलयीन कोठडी देण्यात आली असून पुढील तपास केला जात आहे.









