मारिहाळ पोलिसांची कारवाई, 35 प्रकरणात सहभागी
बेळगाव : चोऱ्या, लुटमार प्रकरणात तब्बल सात वर्षांपासून फरारी असलेल्या पुण्यातील एका आरोपीला मारिहाळ पोलिसांनी अटक केली आहे. बेळगावसह वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यावर चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. अजीम बशीर पटेल (वय 40 रा. हुडको कॉलनी, पुणे) असे त्याचे नाव आहे. एका मारिहाळ पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात त्याने 28 गुन्हे केले आहेत. माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 2, एपीएमसी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 7 असे एकूण 35 हून अधिक गुन्ह्यात यापूर्वी त्याला अटक झाली होती. मारिहाळचे पोलीस निरीक्षक गुरुराज कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ नायक, चंद्रशेखर सी, हवालदार एम. एस. चावडी, एच. एल. यलगुद्री, आर. एस. पाटील आदींनी ही कारवाई केली आहे. अटकेची कारवाई पूर्ण करून अजीमला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. तब्बल 35 गुन्ह्यात संशयित आरोपी असणारा अजीम न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर पुढील तारखांना हजर झाला नव्हता. तब्बल सात वर्षांपासून तो पोलीस व न्यायव्यवस्थेला हुलकावणी देत होता. त्याचा शोध घेण्यासाठी मारिहाळ पोलिसांचे एक पथक पुण्याला पाठविण्यात आले होते. शनिवार दि. 25 नोव्हेंबर रोजी अजीमला अटक करण्यात आली आहे.









