कायद्यानुसार मतपत्रिका वापरण्यास परवानगी असल्याचे काँग्रेसचे स्पष्टीकरण : मतपत्रिकेला भाजपचा विरोध
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांऐवजी (ईव्हीएम) मतपत्रिका वापरण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध व्यक्त होत आहे. भाजपने मतपत्रिका वापरण्यास विरोध केला आहे. तर काँग्रेस पक्षाने मतपत्रिका वापरण्याचे समर्थन केले असून कायद्यानुसार परवानगी असल्याचे म्हटले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतपत्रिका वापरण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांनाही उधाण आले आहे. तर राज्य निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांऐवजी मतपत्रिका वापरण्यास तयार आहे. राज्य सरकारने विद्यमान काही नियमांमध्ये सुधारणा केल्यास मतपत्रिकांद्वारे निवडणुका घेण्यासाठी आवश्यक पावले उचलले जातील, असेही म्हटले आहे.
सरकारच्या निर्णयाला विरोध
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएमऐवजी मतपत्रिका वापरण्याच्या सरकारच्या निर्णयाला राज्य भाजपने विरोध केला आहे. लोकशाही व्यवस्था आणि पारदर्शक निवडणुकांना धिक्कार करण्याचा काँग्रेसचा अजेंडा आणि ध्येय आहे, अशी अशी टीका केली आहे. याबाबत सोशल मीडियावर ट्विट करताना प्रदेश भाजप अध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी, मतपत्रिका वापरल्याने निवडणूक अनियमितता होऊ शकते. मतदान केंद्रात कोणत्याही अडथळ्याशिवाय बनावट मतदान करता येते. राहुल गांधींच्या नेतृत्त्वाखाली मतपत्रिकेवर आधारित निवडणुकांना काँग्रेस समर्थन देत आहेत, असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.
2023 च्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम वापरून जिंकणाऱ्या काँग्रेसचे 136 आमदार आणि 9 काँग्रेस लोकसभा सदस्यांनी राजीनामे द्यावेत. मतपत्रिका वापरून पुन्हा निवडणुका जिंका. अन्यथा आपण मतचोरी करून सत्तेत आलो आहोत, हे मान्य करावे, अशी मागणी विजयेंद्र यांनी केली आहे.
भाजप घाबरत का आहे : शिवकुमार
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ईव्हीएमऐवजी मतपत्रिका वापरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाला भाजप घाबरत का आहे, असा प्रश्न करत उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मतपत्रिका वापरण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. शुक्रवारी बेंगळूरमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, निवडणूक कायद्यातच मतपत्रिका वापरण्याची परवानगी आहे. आम्ही हा कायदा बनवला नाही, भाजपने तो बनवला आहे. मग भाजप राज्य सरकारच्या मतपत्रिका वापरण्याच्या निर्णयाला का विरोध करत आहे, असाही प्रश्न त्यांनी केला.
मतपत्रिका वापरण्यास राज्य निवडणूक आयोग तयार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएमऐवजी मतपत्रिका वापरण्यास राज्य निवडणूक आयोग तयार आहे. जर सरकारने काही विद्यमान नियमांमध्ये सुधारणा केल्या तर आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतपत्रिका वापरण्यासाठी पावले उचलू. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतपत्रिका तयार करण्याची परवानगी राज्य निवडणूक आयोगालाच आहे, असे राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जी. एस. संगरेसी यांनी सांगितले आहे.
आपकडून निर्णयाचे स्वागत
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ईव्हीएमऐवजी मतपत्रिका वापरण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे आम आदमी पक्षाने स्वागत केले आहे. अलिकडच्या निवडणुकीत मतदानात हेराफेरी झाल्याच्या इंडिया अलायन्सच्या नेत्यांनी केलेल्या गंभीर आरोपांना पंतप्रधान मोदींनी उत्तर दिलेले नाही. याशिवाय, आरोप झालेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाने योग्य स्पष्टीकरण न देता आरोप करणाऱ्या नेत्यांविऊद्ध निवेदन जारी केले आहे. अशा परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतपत्रिकांचा वापर स्वागतार्ह आहे, असे आपचे राज्य माध्यम समन्वयक जगदीश व्ही. सदम यांनी स्पष्ट केले.









