एशियन गेम्स : कंपाऊंड प्रकारात मिळवले सुवर्ण : स्क्वॅश मिश्र दुहेरीत दीपिका-हरिंदरची गोल्डन कामगिरी : सौरव घोषालला एकेरीचे रौप्य : कुस्तीत अंतिम पांघलला कांस्य
वृत्तसंस्था /हांगझाऊ
चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय शिलेदारांनी आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. स्पर्धेच्या बाराव्या दिवशी महिला व पुरुष तिरंदाजी संघाने कंपाऊंड प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. तसेच स्क्वॅशमध्ये मिश्र दुहेरीत प्रकारात दीपका व हरिंदर यांनी सुवर्णपदक मिळवले. याशिवाय, स्क्वॅशमध्ये वैयक्तिक गटात सौरव घोषालने रौप्य तर कुस्तीत अंतिम पांघलने कांस्यपदक पटकावले. यासह पदकतालिकेत भारत चौथ्या स्थानी कायम आहे. भारताने आतापर्यंत 21 सुवर्ण, 32 रौप्य व 33 कांस्यपदकासह एकूण 86 पदके मिळवली आहेत. विशेष म्हणजे, स्पर्धा संपण्यास अद्याप तीन दिवस बाकी असून भारताला शंभरचा आकडा गाठण्याची नामी संधी असणार आहे.
भारतीय संघासाठी गुरुवारचा दिवस खास ठरला. सकाळच्या सत्रात ज्योती सुरेखा वेन्नम, आदिती स्वामी आणि परनीत कौर यांच्या महिला तिरंदाजी संघाने भारताला 19 वे सुवर्ण पदक जिंकून दिले. कंपाऊंड प्रकारात महिला तिरंदाजी संघाने अंतिम सामन्यात तैवानला 230-229 अशा फरकाने पराभूत केले.
महिला कंपाऊंड तिरंदाजी खेळात पहिल्या राऊंडनंतर भारतीय त्रिकुट 56-54 ने पिछाडीवर होते. दुसऱ्या राऊंडनंतर ज्योती, आदिती स्वामी आणि परनीत कौर यांनी दमदार पुनरागमन केले. त्यानंतर एकूण स्कोर 112-111 झाला. तिसऱ्या राऊंडमध्ये तैवानच्या खेळाडूंनी शानदार प्रदर्शन केले आणि स्कोर 171-171 असा बरोबरीत सुटला. चौथ्या राऊंडमध्ये भारतीय त्रिकुटाने चांगला स्कोर करत सुवर्ण पदक आपल्या नावावर केला. अंतिम 3 शॉटमध्ये भारतीय खेळाडूंनी एकूण 30 स्कोर केला आणि 230-229 या स्कोरसह तगड्या तैवानला पराभूत करत सुवर्णपदक जिंकले. तैवानला रौप्यपदक तर दक्षिण कोरियाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
पुरुष तिरंदाजी संघही सुवर्णविजेता
दरम्यान, गुरुवारी सकाळी महिलांनी कंपाऊंड प्रकारात सुवर्णयश संपादन केल्यानंतर पुरुषांच्या तिरंदाजी संघानेही शानदार कामगिरी करत सुवर्णपदक मिळवले. ओजस देवतळे, प्रथमेश जावकर आणि अभिषेक वर्मा यांचा समावेश आहे. यापैकी ओजस व प्रथमेश हे महाराष्ट्रासाठी खेळत असतात. भारतीय संघाने अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाचा 235-230 असा पराभव केला. सुरुवातीपासून आक्रमक खेळणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या राऊंडमध्ये 58 तर कोरियाने 55 स्कोर केला. यानंतर दुसऱ्या राऊंडमध्ये कोरियाने पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आघाडी 116-114 अशी कमी केली. यानंतर तिसऱ्या राऊंडमध्ये भारताने 175-171 अशी आघाडी कायम ठेवली. चौथ्या राऊंडमध्येही भारताने आपला दबदबा कायम ठेवत 235-230 स्कोरसह सुवर्णपदकाला गवसणी घातली. दरम्यान, महाराष्ट्राच्या ज्योती आणि ओजस देवतळे यांच्या कंपाऊंड मिश्र सांघिक स्पर्धेत विजयानंतर 2023 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. तसेच साताऱ्याच्या आदितीनेही कंपाऊंड प्रकारात यश मिळवताना सुवर्णपदक जिंकले. या तिघांचेही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
स्क्वॅशमध्ये गोल्डन कामगिरी
स्क्वॅश मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या दीपिका पल्लिकल व हरिंदरपाल सिंग या जोडीने मलेशियाच्या जोडीचा 2-0 असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. स्क्वॅशमधील भारताचे हे दुसरे सुवर्णपदक ठरले. यापूर्वी भारताच्या पुरुष संघाने स्क्वॅशचे सुवर्णपदक जिंकले होते. दीपिका आणि हरिंदर या जोडीला मलेशियाच्या बिंती अजमा आणि मोहम्मद सफिक यांच्याकडून कडवे आव्हान मिळाले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात भारतीय जोडीने पहिला सेट 11-10 असा जिंकला. यानंतर दीपिका आणि हरिंदर दुसऱ्या सेटमध्ये 9-3 ने पुढे होते, परंतु मलेशियाच्या जोडीने बॅक टू बॅक पॉइंट घेत गुणसंख्या बरोबरी केली. येथून हरिंदरने दोन गुण मिळवले आणि दुसरा सेट 11-10 असा जिंकून भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. हा सामना भारतीय खेळाडूंनी अवघ्या 35 मिनिटांत जिंकला. दीपिका पल्लीकल ही भारताचा आघाडीचा क्रिकेटपटू दिनेश कार्तिक याची पत्नी असून, मागील दहा वर्षांपासून ती भारताचे प्रतिनिधित्व करते. दीपिकाचे या आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे दुसरे पदक आहे. याआधी तिने महिला संघासह कांस्यपदक जिंकले होते. आता तिच्या खात्यात एक सुवर्ण, एक रौप्य आणि चार कांस्य अशी सहा आशियाई क्रीडा पदके तिच्या खात्यावर जमा आहेत.
सौरव घोषालला सिल्वर
दरम्यान, भारताचा आघाडीचा स्क्वॅशपटू सौरव घोषालला गुरुवारी वैयक्तिक गटाच्या अंतिम फेरीत मलेशियाच्या इयान एनजीकडून 3-1 असा पराभव स्वीकारावा लागला. चुरशीच्या झालेल्या या सामन्यात सौरवने शानदार खेळाचे प्रदर्शन साकारले. पण अंतिम क्षणी त्याला 11-9, 9-11, 5-11, 7-11 असा पराभव स्वीकारावा लागला. यासह मलेशियाच्या इयानने सुवर्ण तर सौरवला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. दरम्यान, सौरवचे हे आशियाई स्पर्धेतील एकूण नववे पदक आहे.
कुस्तीत अंतिम पांघलला कांस्य
गुरुवारी कुस्ती क्रीडा प्रकारात भारताला दुसरे पदक मिळाले. बुधवारी सुनील कुमारने कांस्यपदक जिंकले होते. यानंतर आज महिलांच्या 53 किलो गटात अंतिम पांघलने मंगोलियाच्या विश्व चॅम्पियन बेट ओचिरला 3-1 असे नमवले. पांघलने शानदार सुरुवात करताना सुरुवातीपासून लढतीवर वर्चस्व गाजवले. याचा तिला फायदा झाला. दरम्यान, 19 वर्षीय अंतिमचे हे आशियाई स्पर्धेतील पहिलेच पदक आहे.
पदकतालिकेत भारत चौथ्या स्थानी कायम
आशियाई स्पर्धेच्या बाराव्या दिवशी चीनने 178 सुवर्णपदकासह एकूण 335 पदकांची कमाई करताना अव्वलस्थान कायम राखले आहे. भारताने बाराव्या दिवशी तीन सुवर्ण, एक रौप्य व एका कांस्यपदकाची कमाई केली. भारताकडे आता 21 सुवर्णपदकासह 32 रौप्य व 33 कांस्यपदकासह एकूण 86 पदके आहेत. सध्या भारत पदकतालिकेत चौथ्या स्थानी कायम असून स्पर्धा संपण्यास अद्याप दोन दिवस बाकी आहेत. काही क्रीडा प्रकारात भारताने अंतिम फेरी गाठली असून दोन दिवसात भारत शंभरचा आकडा पार करेल, यात शंकाच नाही.
गुरुवारचे पदकविजेते –
- तिरंदाजी – महिला कंपाऊंड संघ, सुवर्णपदक
- तिरंदाजी – पुरुष कंपाऊंड संघ, सुवर्णपदक
- स्क्वॅश – मिश्र दुहेरी, सुवर्णपदक
- स्क्वॅश – सौरव घोषाल, एकेरी, रौप्यपदक
- कुस्ती – अंतिम पांघल, कांस्यपदक..









