सांगली सराफ कट्टा येथे त्यांचा करण्यात आला सत्कार
सांगली प्रतिनिधी
एका सामान्य छायाचित्रकाराच्या खात्यावर म्हैसुर येथून सहा लाख 75 हजाराचा ऑनलाईन आरटीजीएसने चुकून रक्कम आली. ही चुकुन आलेली रक्कमेबाबत तात्काळ बँकेला जावून सांगत ही रक्कम परत पाठवण्याचा प्रामाणिकपणा दाखवणाऱ्या छायाचित्रकाराचा सत्कार सांगलीत सराफकट्टा येथे करण्यात आला. सत्कार करण्यात आलेल्या छायाचित्रकाराचे नाव रवी काळबिरे असे आहे. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक करण्यात येत आहे.
रवी काळबिरे यांचे बॅक ऑफ बडोद्याच्या मारूती रोड शाखेत बचत खाते आहे. या बचत खात्यावर म्हैसुरच्या इंडियन ओव्हरसिज बँकेच्या विजयनगर शाखेतून सहा लाख 75 हजार रूपये इतकी रक्कम आरटीजीएसने आली. त्यानंतर रवी काळबिरे यांनी तात्काळ बँक ऑफ बडोद्यामध्ये जावून ही रक्कम माझी नाही. असे त्यांनी सांगितले. त्यावेळी बँकेने याबाबत चौकशी केली असता ही रक्कम म्हैसुर येथील ओव्हरसिज बँकेकडून आली असल्याचे समजले त्यांनी तात्काळ या बँकेशी संपर्क साधला आणि ही रक्कम परत घेण्याचा आदेश दिला. हा आदेश दिल्यानंतर ही रक्कम त्या बँकेने काढून घेतली आणि त्या बँकेकडून रवी काळबिरे यांचे प्रामाणिक पणाचे कौतुक करणारे एक पत्र त्यांना देण्यात आले. याची माहिती सराफ कट्टा येथील रवी काळबिरे यांच्या मित्रांना समजली त्यानंतर त्यांच्या मित्रांनी त्याचा या प्रामाणिकपणाबद्दल उचित सत्कार केला.
भाजपाचे नेते पृथ्वीराज पवार यांच्याहस्ते रवी काळबिरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सराफ समितीचे अध्यक्ष राजू शेठ पेंडुरकर, रवी काळबिरे यांच्या मात़ोश्री विमल काळबिरे, सुनील पिराळे, सुधाकर नार्वेकर, सावकार शिराळे, गजानन पोतदार, चंद्रकांत मालवणकर, सुरेश जाधव, राजू कासार, संजय काळबिरे, संजय मोहिते, विनायक साळुंखे अशोकराव मालवणकर, देसाई, बळीराम महाडिक, अशोक बेळवलकर उपस्थित होते.