पावसाने राज्यात सगळीकडे जोर धरला आहे. धरणे तुडुंब भरू लागली आहेत. राज्यातील दोघांचे मंत्रिमंडळ 20 जणांचे झाले. राजी, नाराजी खातेवाटप आणि टिकाटिप्पणी सुरू आहे. पावसाळी अधिवेशनाचे वेध लागले आहेत. त्याच जोडीला देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहे. या अमृतमहोत्सवी वर्षाचा संकल्प, उपलब्धी आणि लाल किल्ल्यावरचे पंतप्रधानांचे भाषण याकडे सर्वांचे लक्ष आहे. बिहारमध्ये पाठिंबा बदलून नितीशकुमार यांनी पुन्हा सत्तेचे गणित जमवले आहे आणि पवारांनी महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातील सरकार कोसळल्यावर धरलेले मौन सोडत भाजपावर निशाणा साधला आहे. पाऊस राज्यात सर्वत्र कमी अधिक बरसतो आहे. धरणे, तलाव, बंधारे भरले आहेत. नद्या दुथडी भरून वाहत आहेत. हा सारा आनंदाचा, समाधानाचा विषय असला तरी काही ठिकाणी अतिवृष्टी आणि महापूर यामुळे समस्या निर्माण झाल्या आहेत. वाहत्या पाण्यात दुचाकी, चारचाकी गाडय़ा घालण्याचे दुःसाहस काही ठिकाणी जीवघेणे ठरले आहे. पाणी, वारा, अग्नी यांची शक्ती व परीक्षा घेऊ नये. पण, उत्साही आणि अविचारी मंडळींना कोण आवरणार. पोलीस आणि प्रशासन अशा मंडळींना इशारा देण्याचा, रोखण्याचा प्रयत्न करतात. पण, काहींना अशा पाण्यात सेल्फी किंवा साहसी व्हिडीओ काढण्यात रस असतो. त्यातूनही काही दुर्घटना घडतात. पण कुणाला शहाणपण सुचत नाही. राज्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत पाऊस आहे. काही रस्ते बंद आहेत. नद्यांना पूर आला आहे. धरणातून विसर्ग सुरू आहे. अशावेळी सावध, सतर्क राहिले पाहिजे आणि काळजीपूर्वक व्यवहार आणि आचरण ठेवले पाहिजे. पण, सारेच प्रवाहपतीत अशी अवस्था आहे. मोहरमचा मुहूर्त साधत शिंदे-फडणवीस सरकारमधील अठरा मंत्र्यांचा शपथविधी झाला. यावर आता टिकाटिप्पणी सुरू आहे. संजय राऊत त्यांच्या पत्नी सौ. वर्षा राऊत यांची ईडी चौकशी व संजय राऊत यांची कोठडी यावरूनही आरोप प्रत्यारोपाची राळ उडवली जाते आहे. मंत्रिमंडळात अठरा जणांना संधी मिळाली आहे. दुसऱया टप्प्यात आणखी काहींना संधी मिळणार हे स्पष्ट आहे. पण, मंत्रिमंडळ विस्तार करताना विभागवार न्याय व सामाजिक न्याय, कार्य कौशल्य नवे जुने आणि कार्यक्षमता यांचा विचार करावा लागतो. या जोडीला राज्यातील जनतेच्या इच्छा आकांक्षाचे त्यात प्रतिबिंब गरजेचे असते. संजय राठोड यांना दिलेली संधी आणि एकही महिलेला मंत्रीपद न देणे यांचा अर्थाअर्थी संबंध नसला तरी हा विषय सोशल मीडियावर ट्रोल होतो आहे. शेवटच्या क्षणी एका महिलेला भाजपाकडून मंत्रीपदाची संधी दिली जाणार असे अंदाज वर्तवले जात होते पण, ते साफ चुकीचे ठरले आणि नेहमीचेच गुणवंत मंत्रीपदाची शपथ घेताना दिसले. मुंबईत मराठी चेहरा असलेला मंत्री मिळाला नाही. आणि पश्चिम महाराष्ट्रातही फार काही आगळे वेगळे केले असे दिसले नाही. सोलापूरला तर संधीच दिलेली नाही. काही चमकदार, नवे चेहरे येतील अशी आशा नमनालाच फोल ठरली आहे. आता ही टिम 20 कशी काम करते ते बघायचे. पण शपथविधी झाला मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली पण, अद्याप खातेवाटप झालेले नाही. कुणाला कोणते खाते मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडे पूर्वी महसूल खाते होते तर मुख्यमंत्र्यांकडे नगरविकास खाते होते. सुधीर मुनगंटीवार अर्थखाते सांभाळत होते. मंत्रिमंडळात महसूल सार्वजनिक बांधकाम, गृह, आरोग्य ग्रामविकास आदी खाती मलईदार व महत्वाची मानली जातात ती कोणाच्या पदरात पडतात हे बघायचे. मुख्यमंत्र्यांनी अजून खातेवाटप केलेले नाही पण, मीडियाने खातेवाटप ठरवून टाकलेले दिसते. सुत्रांचा हवाला देत फडणवीस गृह व वित्त तर एकनाथ शिंदे नगरविकास आणि चंद्रकांतदादा पाटील सार्वजनिक बांधकाम तर सुरेश खाडे सामाजिक न्याय खाते सांभाळणार असे सांगितले जाते आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाने केलेले खातेवाटप अशी त्यांची बोळवण करत सर्वांना धक्कादायक व वेगळे खातेवाटप केले जाईल असे स्पष्ट केले आहे. भाजपाचे केंद्रीय नेतृत्व खातेवाटपाबाबत कोणता व कसा निर्णय घेईल हे सांगणे कठीण. मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेंना बहाल करताना शहा-मोदींनी अशीच धक्कादायक खेळी खेळली होती. खातेवाटपातही ती होईल हे वेगळे सांगायला नको. बिहारमध्ये सत्तापालट व संजद राजद एकत्र येऊन भाजपाला बसलेला धक्का यामुळे खरे तर खातेवाटप लांबणीवर पडले आहे. केंद्रीय नेते आता यावर निर्णय घेतील व खातेवाटप होईल हे स्पष्ट आहे. भाजपला राज्यात ओबीसी, मराठा कार्ड चालवायचे आहे हे लपून राहिलेले नाही. त्यामुळे मंत्रिमंडळात मलईदार खातीही या धोरणानुसार वाटली जातील हे स्पष्ट आहे. भाजपाला मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकायच्या आहेत. भाजपाने 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. शहा-मोदी जोडी लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याच्या प्रयत्नात आहेत आणि भाजपाने हातात नसलेल्या महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. बारामताची लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठेची होणार आहे. भाजपाने तेथे काम सुरू केले आहे. शरद पवार यांनीही सावध होत बारामतीत बुथवाईज प्लॅनिंग सुरू केले आहे. भाजपाच्या टार्गेटवर राष्ट्रवादी जशी आहे तशी शिवसेना मातोश्री गट आहे. त्यामुळे वेगवेगळय़ा प्रमुखावर जबाबदारी सोपवून भाजपाने जमीन कसायला सुरूवात केली आहे. शरद पवार यांनी गेले काही दिवस मौन पाळले होते. विशेषतः संजय राऊत यांच्या कोठडीनंतर ते काही बोलतील, अशी अपेक्षा होती. शिवसेना शरद पवारांच्या या मौनामुळे नाराज आहे असे म्हटले जाते. पवारांनी बिहारमधील घडामोडीनंतर भाजपावर पुन्हा निशाणा साधला. राजकारणात हे सुरूच राहणार आता देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी देश कोणती पावले उचलतो, कोणती दिशा पकडतो हे पाहावे लागेल.
Previous Articleभक्तीने सिद्धी प्राप्त होते
Next Article कालिदासाचे मेघदूत… एक खंडकाव्य (36)
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








