24 रोजी भव्य चित्ररथ मिरवणूक : मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महामंडळाचा बैठकीत निर्णय, नेहमीच्या मार्गाने चित्ररथ मिरवणूक काढणार
बेळगाव : विधानसभा निवडणुका जाहीर झाल्याने आचारसंहिता आणि शासनाच्या नियमावलीचे पालन करीत परंपरेनुसार अक्षय्यतृतियाच्या मुहूर्तावर दि. 22 एप्रिल रोजी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. तसेच दि. 24 रोजी नेहमीच्या मिरवणूक मार्गाने चित्ररथ मिरवणूक काढण्याचा निर्णय मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. महामंडळाचे पदाधिकारी व सदस्यांची बैठक रविवारी सायंकाळी जत्तीमठ येथे आयोजित केली होती. प्रकाश मरगाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शिवजयंती उत्सव साजरा करण्याबाबत चर्चा करण्यात आली. आचारसंहिता असली तरी नियमांचे पालन करीत शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचे ठरविण्यात आले. विधानसभा निवडणूक असल्याने शिवजयंती उत्सव साध्या पद्धतीने साजरा करून शिवजयंती चित्ररथ मिरवणूक निवडणुकीनंतर काढण्यात यावी याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. परंपरेनुसार दि. 22 रोजी शिवजयंती साजरी करण्याबरोबरच दि. 24 रोजी चित्ररथ मिरवणूक काढण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आला. त्याचप्रमाणे मिरवणूक मार्गातदेखील कोणताच बदल केला जाणार नाही हे देखील बैठकीत स्पष्ट करण्यात आले. काहींनी चित्ररथ मिरवणूक तारीख आणि चित्ररथ मिरवणूक मार्गात बदल करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. पण याबाबत कोणताच बदल होणार नसल्याचे सांगण्यात आले. यावेळी मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाचा सन 2022-23 सालचा जमा खर्चाचा हिशोब राजू मरवे यांनी सादर केला. त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
सादरीकरणाचा वेळ निश्चित करावा
सन 2023-24 सालाकरिता निवड करण्यात आलेल्या कार्यकारिणी मंडळातील पदाधिकाऱ्यांची नावे वाचून दाखविण्यात आली. चित्ररथ मिरवणुकीस प्रारंभ करण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी काही कार्यकर्त्यांनी केल्या. चित्ररथासमोर ढोलताशे आणि लाठीचे प्रात्यक्षिक सादर केले जाते. सजीव देखावादेखील सादर केला जातो. त्यामुळे प्रत्येक मंडळाच्या सादरीकरणासाठी 50 ते 60 मिनिटांचा वेळ लागत आहे. त्यामुळे ढोलताशा आणि सजीव देखावा सादरीकरणाचा वेळ निश्चित करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी याबाबत विचार करून कमीतकमी वेळेत चांगले सादरीकरण कसे होईल, याबाबत निर्णय घ्यावा व चित्ररथ मिरवणूक वेळेत काढून लहान मुलांसह सर्वांना हे पाहता येईल याची दक्षता घ्यावी, असे सूचित करण्यात आले. य् ााप्रसंगी शिवराज पाटील यांनी प्रास्ताविक केले. रणजित हावळाण्णाचे, मदन बामणे, शंकर पाटील, विश्वनाथ सूर्यवंशी, गणेश द•ाrकर, शुभम शेळके, राम भिंगुर्डे, प्रकाश मरगाळे आदींनी आपल्या सूचना मांडल्या. शिवजयंती उत्सव मंडळाच्या तारखेबाबत कोणताच गैरसमज करू नये तसेच शासनाकडे आपण अर्ज केल्यानंतर शासनाकडून कोणत्या सूचना येतात ते पाहून पुन्हा बैठक घेऊन निर्णय घेऊ असे मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी सांगितले. मोहन कारेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. य् ाावेळी बैठकीला विनोद आंबेवाडीकर, श्रीकांत कदम, प्रकाश हेब्बाजी, माजी महापौर मालोजी अष्टेकर, अंकुश केसरकर, अभिजित मजुकर आदींसह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.









