पुणे / प्रतिनिधी :
पक्षाची ज्या भागात ताकद जास्त, त्याला ती जागा मिळायला हवी. मागच्या निवडणुकांवरून त्या-त्या पक्षाच्या क्षमतेचा व ताकदीचा अंदाज येऊ शकतो, असे सांगत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्याची जागा लढविण्यासाठी राष्ट्रवादी इच्छुक असल्याचे सांगितले.
आगीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी टिंबर मार्केटमधील दुर्घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. लोकसभेला निवडणुकीला अवघ्या वर्षाचा कालावधी असल्याने पुण्याची पोटनिवडणूक होणार नाही, असे मला वाटले होते. मात्र, आता पुण्याची पोटनिवडणूक होऊ शकते, अशी माहिती मला आतल्या गोटातून मिळत आहे. तीही नाकारता येणार नाही. गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी पोटनिवडणूक लागण्याची शक्यता लक्षात घेऊन आता तयारी करावी लागेल. आम्ही पुण्याची जागा लढविण्यासाठी इच्छुक आहोत. राष्ट्रवादीची ताकद इतर पक्षांच्या तुलनेमध्ये जास्त आहे. महानगरपालिकेत आम्ही आमची ताकद दाखवली आहे. आमचे 40 नगरसेवक होते. आमच्या मित्र पक्षाचे 10 नगरसेवक होते. शहरात राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत. खासगीमध्ये रवींद्र धंगेकरांनाही विचारा. त्यांना निवडून आणण्याकरिता सगळय़ा आघाडीच्या पक्षांनी सहकार्य केले.
वास्तविक निवडणूक लागेल, तिथे मित्र पक्षांमध्ये ज्यांची ताकद जास्त असेल, त्यांना ती जागा मिळावी. आता ताकद पाहण्यासाठी मागे झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा निवडणुकांची माहिती घ्यायची. साधारण कोणाला किती मते पडली, अशी माहिती घेतल्यानंतर सर्वसाधारण अंदाज येतो. काँग्रेसने आपणच ही जागा लढणार असल्याचा दावा केला, असला, तरी तो त्यांचा अधिकार आहे. आमच्या मित्र पक्षाला माझ्या शुभेच्छा आहेत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
तेव्हाच सर्व काही स्पष्ट होईल….
राजू शेट्टी यांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली असल्याकडे लक्ष वेधले असता पवार म्हणाले, प्रत्येकजण आपापली भूमिका मांडत आहे. सगळय़ांना जे काही बोलायचेय, ते बोलू द्या. निवडणुका जाहीर होऊन निर्णय होईल, तेव्हाच हे सगळे स्पष्ट होईल, अशी टिप्पणीही पवार यांनी केली.








