दहा वर्षात 580 जणांचे बळी, 2 हजार जण जखमी : रस्त्यांची रुंदी वाढविण्याची मागणी
बेळगाव : निपाणी-मुधोळ राज्य महामार्गावर गेल्या दहा वर्षात झालेल्या वाहन अपघातात 580 हून अधिक जणांचा बळी गेला आहे. तर 2 हजारहून अधिक जण जखमी झाले आहेत. अतिवेग, दुर्लक्षपणा, वाहनांची वाढती वर्दळ, अरुंद रस्त्यामुळे 108 किलोमीटरच्या या रस्त्यावर अपघात वाढल्याचे जाणवते. राज्य महामार्ग विकास योजनेंतर्गत 437 कोटी रुपये खर्चातून डिसेंबर 2014 मध्ये या महामार्गाचे काम झाले आहे. या महामार्गाला सुरुवात झाल्यापासून वाहनांची वर्दळ वाढतच चालली आहे. त्यामुळे साहजिकच अपघातांचे प्रमाणही वाढले असून अपघातात 580 जणांचा मृत्यू झाला आहे. निपाणी-मुधोळ राज्य महामार्ग सध्या सात मीटरचा आहे. तो नऊ मीटर व्हायला हवा होता. जत-जांबोटी महामार्ग मात्र नऊ मीटरचा आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी पादचारी, मोटरसायकलस्वारांसाठी स्वतंत्र तीन मीटरचा रस्ता असायला हवा होता. तो नसल्यामुळे मुख्य महामार्गावरूनच पादचाऱ्यांनाही चालत जावे लागते. एखादा अपघात घडला की अपघाताच्या तीव्रतेने पादचाऱ्यांवर मृत्यू ओढवतो.
चालू वर्षाच्या केवळ दोन महिन्यात 30 अपघात
या महामार्गाचे ज्यांनी कंत्राट घेतले होते त्या अशोक बिल्डकॉन कंपनीकडून 2024 च्या अखेरपर्यंत अपघातातील जखमींवर तातडीचे उपचार करणे, त्यांना इस्पितळात हलवण्याचे काम केले जात होते. कंत्राटाची मुदत संपल्यामुळे तातडीची वैद्यकीय सेवाही बंद झाली आहे. चालू वर्षाच्या केवळ दोन महिन्यात 30 अपघात घडले असून दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. पूर्वीप्रमाणेच महामार्गावरील अपघातातील जखमींना त्वरित वैद्यकीय सेवा मिळविण्याची व्यवस्था करण्याची गरज निर्माण झाली आहे.









