चालू आठवाड्यात दुसरा अपघात, संरक्षक कठड्यामुळे मोठा अपघात टळला
(साटेली भेडशी प्रतिनिधी )
महाराष्ट्र गोवा कर्नाटक यांना जोडणारा महत्त्वाच्या तिलारी घाटातील अपघातांचे सत्र काही केल्या थांबत नसून चालू आठवाड्यात आज शनिवारी सकाळी घाट उतरत असताना महिंद्रा पिकअप मालवाहतूक गाडी अरुंद वळणदार रस्त्याबाजूच्या कठड्याला धडक देत पलटी झाली.
अपघाताबाबत घटनास्थळांवरून मिळालेल्या माहितीनुसार बेळगावहुन तिलारी घाटातून गोव्याच्या दिशेने येत असताना घाटातील अरुंद वळणदार रस्त्याचा अंदाज न आल्याने व गाडीवरील नियंत्रण सुटल्याने थेट गाडी रस्त्याकडेच्या संरक्षक कठड्याला धडकली व पलटी झाली.अपघातात ही गाडी संरक्षक कठड्याला धडलकल्याने मोठा अपघात टळला. संरक्षक कठडा नसता तर रस्त्यालगतच्या मोठ्या खोल दरीत कोसळून मोठा अपघात घडला असता. मागील काही महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने तिलारी घाटातील कमकुवत झालेले तसेच संभाव्य अपघात क्षेत्रातील संरक्षक कठडे ,सिमेंट काँक्रीटच्या भिंती उभारले या उपाययोजनांमुळे मोठे अपघात टाळणे शक्य झाले आहे.याबद्दल समाधान व्यक्त होत असले तरी रोज होणारे अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने घाटटरस्त्याच्या सुरू होण्याच्या दोन्ही ठिकाणी मार्गदर्शक सूचना व घाटमार्गात दिशादर्शक फलक लावावेत जेणेकरून घाटरस्त्याचा वाहतुकीचा अनुभव नसलेल्या चालकांना मार्गदर्शक ठरेल व यातून काळजीपूर्वक वाहने चालवून अपघात टाळण्यास मदत होईल अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.









