पणजी-फोंडा महामार्गावर बाणस्तारी पुलाजवळ एका अलिशान कारगाडीने एका दाम्पत्यासह तिघा निष्पाप लोकांचे बळी घेतले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पाच जणांचे जीवनही या दुर्घटनेने उद्ध्वस्त केले आहे. मद्यधुंद अवस्थेत बेदरकार वाहन हाकीत सहा वाहनांना उडवित तिघांचे बळी घेणारा हा संशयित कारचालक गोव्यातील नामवंत बिल्डर आहे. ही घटना जेवढी दुर्दैवी तेवढीच संतापजनक असून संपूर्ण गोव्यात त्यावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
विधानसभा अधिवेशनातही त्यावर तीव्र पडसाद उमटले. या घटनेला निव्वळ अपघात म्हणायचा झाल्यास, तो चुकीमुळे घडलेला नाही. अक्षम्य निष्काळजीपणा व बेमुर्वतपणाच्या प्रवृत्तीने घेतलेले हे बळी आहेत. या प्रकरणी संशयित परेश सावर्डेकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली, त्याला वेगळेच वळण मिळाले आहे. अपघातग्रस्त वाहन संशयित परेश नव्हे तर त्याची पत्नी चालवत होती. पोलीस तिला पाठीशी घालत असून खऱ्या संशयिताला तात्काळ अटक करावी, यासाठी जनरेटा वाढत आहे. ज्या फडते दाम्पत्याचा या अपघातात बळी गेला, त्या दिवाडी गावातील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत, पोलिसांच्या तपासाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
तपासकार्यात प्रथमदर्शनी आवश्यक असलेले सर्व पुरावे घटनास्थळी उपस्थित प्रत्यक्षदर्शिनी उजेडात आणले आहेत. या अपघातापासून थोडक्यात बचावलेल्या एका साक्षीदाराने तर सदर वाहन महिलाच चालवत होती, हे बेधडकपणे सांगत निर्भिडपणे साक्ष देण्याची तयारी दाखविली आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपास कार्याला दिशा मिळाली असून या सर्व शक्यता तपासणे क्रमप्राप्त ठरते. घटनास्थळी मृतदेहांची ओळख पटण्यापूर्वी व जखमींना इस्पितळात दाखल करण्याआधीच संशयिताची ओळख दडविण्याचे व साक्षीपुरावे मिटविण्याचे प्रयत्न निरर्थक ठरतात. प्रसार माध्यमांनी घटनास्थळांवरील विदारक परिस्थिती व साक्षीपुराव्यांना पुष्टी देणाऱ्या बऱ्याच गोष्टींवर झळझळीत प्रकाश टाकलेला आहे. प्रत्यक्ष घटनेचे साक्षीदार असलेल्या लोकांनी आपापल्या मोबाईल कॅमेरातून परिस्थितीचे चित्रण केले आहे. त्यामुळे तपासकार्यात लपाछपी करून लोकांची दिशाभूल करता येणार नाही. सध्या संशयित बिल्डरला अटक करून त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे पण एवढ्यावरच हे प्रकरण संपत नसून अपघातातील निष्पाप मृतांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी खरी लढाई आता सुरू होणार आहे.
गोव्यात घडलेली अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही मद्यधुंद वाहनचालकांनी निष्पाप लोकांचे बळी घेतले आहेत व अपघात करणारी बडी धेंडे त्यातून सहीसलामत सुटलीही आहेत. अशा घटना घडल्यानंतर समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटतात व काही दिवसांनी त्या विसरल्याही जातात पण त्यात न्याय मिळविताना खरी फरफट होते ती अपघातग्रस्त मृतांचे कुटुंबीय व जखमींची. याची प्रचिती काही वर्षांपूर्वी फोंडा शहरात घडलेल्या एका अपघाताच्या घटनेतून येते. अग्नीशामक दलाच्या बंबखाली सापडून पेडणे येथील एका तऊण अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. अनेकांच्या डोळ्यांदेखत हा अपघात घडला पण पोलीस तपासापासूनच हा अपघातग्रस्त युवक शासकीय व्यवस्थेचा बळी ठरला. मृत युवकालाच पोलिसांनी अपघातास दोषी धरले. या दुर्घटनेत एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलाचा हकनाक बळी गेला व हे कुटुंब कायमचे उद्ध्वस्त झाले. आपल्या निरपराध मुलाला न्याय मिळावा, यासाठी त्याच्या वयस्क वडिलांचा लढा अजूनही सुरू आहे. बाणस्तारीच्या अपघातात धनिकाच्या अलिशान गाडीखाली चिरडल्या गेलेल्या सर्व व्यक्ती सामान्य नागरिक होत्या. म्हणूनच ही शक्यता नाकारता येत नाही. मुळात हा अपघात ज्यावेळी घडला, तेव्हा वाहनात स्टेअरिंगवर कोण होते, घटनास्थळावरील संशयितांचे एकंदरीत वर्तन, वाहनात आढळलेल्या दारूच्या बाटल्या याचा पंचनामा लोकांनी आधीच केला आहे. तरीही या अपघातामध्ये कुठलाच संबंध नसलेली एक व्यक्ती निव्वळ पैशांच्या आशेने खऱ्या आरोपीला वाचविण्यासाठी आपल्या डोक्यावर हे पाप घेण्यासाठी तयार झाली. यावरून संशयिताच्या ताकदीचा अंदाज येतो. आजपर्यंत अशा प्रकारच्या अपघातामध्ये एखाद्या धनिकावर आरोप सिद्ध होऊन कठोर शिक्षा झाल्याची उदाहरणेही तशी कमीच आहेत.
गेल्या सात महिन्यात तब्बल 181 लोकांनी अपघातात आपले जीव गमावले आहेत. त्यापैकी बहुतेक अपघात हे कुणाच्यातरी निष्काळजीपणामुळे घडले आहेत. राज्यातील वाहतूक पोलीस यंत्रणा नियमभंग केल्याबद्दल दिवसाकाठी हजारो वाहनचालकांना दंड ठोठावत असतात. दंडापोटी पोलीस खात्याच्या तिजोरीत कोट्यावधी ऊपये जमा होतात पण एवढ्या मोठ्या प्रमाणात दंड वसूल करून अपघातांचे प्रमाण काही घटलेले नाही. वाहतूक पोलिसही शिस्त लावण्यापेक्षा व जनजागृती करण्यापेक्षा किती लोकांना दंड ठोठावला यातच अधिक समाधान मानतात. रिवॉर्ड मिळविणे किंवा आपल्या वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यासाठी अधिकाधिक केसेस करण्याकडे त्यांना अधिक स्वारस्य दिसते. आता तर हे प्रकरण टार्गेटपर्यंत पोहोचल्याचे ऐकायला मिळते. बाणस्तारी येथील ताजी घटना हा ‘रॅश अॅण्ड निग्लीजन्स’चा प्रकार असला तरी खराब व ख•sमय रस्तेही वाढत्या अपघातांना तेवढेच कारणीभूत ठरत आहेत. ख•s चुकविताना तोल जाऊन एखादा अपघात झाल्यास त्याला कुणाला जबाबदार धरायचे याबाबत कायदे नाहीत. रस्त्यांच्या दैनावस्थेला कंत्राटदार किंवा संबंधित अभियंत्यावर कारवाई झाली असती तर हॉटमिक्स केलेले रस्ते किमान वर्षभर टिकले असते. वाहतूक पोलिसांच्या तोंडावर दंडाची रक्कम फेकून लाखो ऊपयांच्या वाहनावरील काळ्या काचा बदलणार नाहीत. नियम तोडूनही व्यवस्थेला खिशात घालण्याची मुजोरी करणारेही कमी नाहीत.
सदानंद सतरकर








