रायगड प्रतिनिधी
मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वर सातत्याने अपघात घडत असून जीवितहानी देखील होत आहे एप्रिलमध्ये झालेल्या अपघातामध्ये एका ट्रकच्या ब्रेक फेल झाल्याने अकरा गाड्यांचा अपघात झाला होता. अशाच प्रकारचा अपघात सोमवारी रात्री ११ च्या सुमारास खोपोली पासून काही अंतरावर झाला .या अपघातामध्ये एक प्रवाशाचा मृत्यू झाला असून पाच प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद खोपोली पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे.
पोलीस सूत्राकडून मिळालेली अपघाता संदर्भातील माहिती पुढील प्रमाणे, कंटेनर क्र. RJ-19-GH-4497 चा पुणे ते मुंबई असा प्रवास करत असताना किलोमीटर 36 /800 या ठिकाणी आल्यावर ब्रेक फेल झाले. त्याने इको कार क्र MH- 03- DA- 8233, क्रेटा कार क्र. MH – 43- BN- 9114, टाटा जेस्ट कार क्र.MH -14 – EU -352, हुंडाई कार क्र. MH -47-K- 6112 किया कार क्र.MH 03- EB-9777 आणि स्विफ्ट कार MH 02- BM- 9022 या वाहनांना धडक दिली. कंटेनर ची धडक एवढी जबरदस्त होती की धडक दिलेल्या वाहनातील प्रवाशांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या, या भीषण अपघातामध्ये सुभाष पंढरीनाथ चौगुले (४५ रा.वाशी, नवी मुंबई) यांच्या जागीच मृत्यू झाला. तसेच चंद्रकला सुभाष चौगुले ४३ राहणार वाशी, अमित कुमार श्रीहरी राम थठेर ३० राहणार भांडुप , कौशर आली शहा, ४० रा. भांडुप, आफताब शमी उल्ला आलम १९ राहणार भांडुप, अफसर अली मोहम्मद अली ३६ राहणार वडाळा यांचा जखमीमध्ये समावेश आहे.
अपघात झाल्याचे समजताच आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, बोरघाट वाहतूक पॉलिसी यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, आरटीओ, लोकमान्य ॲम्बुलन्स यंत्रणा तसेच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेची टीम घटनास्थळी पोचली. सर्व जखमींना खोपोली नगरपालिका रुग्णालया मध्ये दाखल करण्यात आले असून प्राथमिक उपचार करून जखमींना एमजीएम रुग्णालय पनवेल येथे हलवण्यात आले आहे . या अपघातामध्ये हात तुटल्यामुळे रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात होऊन रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी सुभाष चौगुले यांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर आहेत. अन्य तीन प्रवाशांना किरकोळ स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत.
कंटेनर अपघाताच्या ठिकाणाहून पळून जात असताना बोरघाट वाहतूक पोलीस यंत्रणेने पोलीस उपनिरीक्षक योगेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पाठलाग करून कंटेनर अडवून चालकाला ताब्यात घेतले. हा अपघात खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक. हरेश काळसेकर, पोलीस उप निरक्षक आलोक खीसमतराव यांनी आपल्या कर्मचारी वर्गासह पोहचून घटनेची चौकशी सुरू केली. आर टी ओ विभागाकडून संदीप कोटकर यांची टीम घटनास्थळी मदत करत होती. अपघाताची माहिती मिळताच खोपोली उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला व तहसीलदार आयुब तांबोळी यांनी अपघाताच्या ठिकाणी भेट दिली.