बोकनूर क्रॉसनजीक कारची झाडाला धडक : लष्करी इतमामात अंत्यसंस्कार : सुटीवरील जवानाच्या मृत्यूने शोककळा
वार्ताहर /किणये
बेळगुंदीहून-कडोलीकडे जाताना बेळगाव-राकसकोप रोड, बोकनूर क्रॉसनजीक इंडिका कारची झाडाला जोरदार धडक बसून बेळगुंदी गावच्या जवानाचा जागीच मृत्यू झाला. ओमकार महादेव हिंडलगेकर (वय 21) असे त्याचे नाव आहे. सदर अपघात सोमवारी रात्री 11.30 च्या दरम्यान घडला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हा अपघात मंगळवारी सकाळी ग्रामस्थांच्या निदर्शनास आला.
भावाच्या लग्नानिमित्त सुटीवर आलेल्या जवानाचा असा अपघाती मृत्यू झाल्यामुळे बेळगुंदी गावावर शोककळा पसरली आहे. सुटी संपल्यामुळे ओमकार लष्करी सेवेत पुन्हा दाखल होण्यासाठी मंगळवारी अहमदनगरला रवाना होणार होता. मात्र, त्याआधीच त्याच्यावर काळाने घाला घातला. यामुळे प्रत्येकजण हळहळ व्यक्त करत होता. मंगळवारी दुपारी बेळगुंदी स्मशानभूमीत ओमकारवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
ओमकार हिंडलगेकर हा आर्म्ड रेजिमेंट, अहमदनगर येथे लष्करी सेवा बजावत होता. मोठय़ा भावाच्या लग्नासाठी 15 दिवसांची सुटी घेऊन तो बेळगुंदी येथे आपल्या गावी आला होता. मोठा भाऊ मयूर याचे दि. 3 जुलै रोजी लग्न झाले. लग्न सोहळय़ाच्या निमित्ताने सर्व पै-पाहुणे, मित्रमंडळी यांच्याशी तो मनमोकळेपणाने बोलला होता. त्यांच्यासोबत आनंदाचे क्षणही घालविले होते.
कडोली येथील मामाच्या घरी कारगाडी देऊन मंगळवारी अहमदनगरला जाण्याच्या उद्देशाने तो गावातून सोमवारी रात्री निघाला. संततधार पाऊसही सुरूच होता. वाहनावरील त्याचे नियंत्रण सुटले असावे व अंदाज न आल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला जोराची धडक बसून कार बाजूच्या शिवारात जाऊन कोसळली. सकाळी वॉकिंगला जाणाऱया काही जणांच्या निदर्शनास कार आली.
अपघातात ओमकार जागीच ठार झाला होता. त्यानंतर वडगाव ग्रामीण पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सिव्हिल इस्पितळामध्ये उत्तरीय तपासणीनंतर ओमकारचा मृतदेह मराठा लाईट इन्फंट्रीच्या वाहनातून बेळगुंदीत आणण्यात आला. यावेळी आईवडिल, नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला.
मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांनी ओमकारच्या घराजवळ मानवंदना दिली. त्यानंतर गावातून पार्थिव बेळगुंदी स्मशानभूमीत आणण्यात आले. नायब सुभेदार संतोष नलवडे, नायक शाम मडिवाळकर, नायक प्रवीण यादव यांनी पुष्पचक्र अर्पण करून ओमकारला मानवंदना दिली.
यल्लाप्पा ढेकोळकर, हेमा हदगल, मनोहर बेळगावकर, अशोक गावडा, रामा आमरोळकर, सुनील पाटील, मारुती शिंदे, शिवाजी बोकडे, राजू किणयेकर, कल्लाप्पा ढेकोळकर, महादेव पाटील, रेहमान ताशिलदार, शिवाजी बेटगेरीकर आदींसह बेळगुंदी गावातील विविध संस्था, संघ-संघटना आदींच्यावतीने पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी पंचक्रोशीतील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. मराठा लाईट इन्फंट्री कँप येथील जवानांनी स्मशानभूमीत शोकशस्त्रवंदना व सलामी दिली. त्यानंतर जड अंतकरणाने ओमकारच्या वडिलांनी पार्थिवला भडाग्नी दिला.
ओमकारच्या पश्चात आई-वडील, भाऊ-बहीण, वहिनी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी सकाळी 8 वाजता बेळगुंदी स्मशानभूमीत होणार आहे.
घराचे स्वप्न राहिले अधुरे
ओमकार हा दोन वर्षांपूर्वी लष्करी सेवेत रुजू झाला होता. त्याला लहानपणापासून खेळाची आवड होती. देशसेवा करण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यामुळे जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर तो सैन्यात भरती झाला होता. घरात त्याच्याही लग्नाबाबत चर्चा झाली. आपण बेळगुंदी रोडच्या बाजूला घर बांधूया, चार वर्षांनंतर मी लग्न करून घेईन, असे त्याने आपल्या आईला सांगितले होते. हे सांगताना मात्र त्याच्या आईला अश्रू अनावर झाले होते.