ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शिवसेना नेते आणि माजी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीला शनिवारी रात्री उशिरा पुणे-सोलापूर महामार्गावर वरवंड येथे अपघात झाला. सुदैवाने या अपघातात सावंत आणि त्यांचे सहकारी बचावले, कोणालाही दुखापत झाली नाही.
सध्या शिवसेनेकडून शिवसंपर्क अभियान राबवलं जात आहे. या अभियानासंदर्भात तानाजी सावंत हे दोन दिवस आपल्या मतदारसंघात होते. शनिवारी त्यांनी धाराशिव व भूम शहरात बैठक घेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. रात्री ते पुण्याच्या दिशेने निघाले. त्यावेळी पुणे-सोलापूर महामार्गावर वरवंड येथे त्यांच्या गाडीला अपघात झाला. हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र, सुदैवाने या अपघातातून सावंत आणि त्यांचे सहकरी बचावले. अपघातात त्यांच्या गाडीचे काहीसे नुकसान झाले आहे. अपघातानंतर काही वेळात सावंत पुण्याच्या दिशेने रवाना झाले.








