तोरसे येथे दोघांनी गमावले प्राण : बांबोळी,धारगळीत गेले दोन बळी

प्रतिनिधी /पणजी
राज्यात वाहन अपघातांचे सत्र सुरुच असून, दोन दिवसात झालेल्या तीन अपघातात चारजण ठार झाले आहेत. तोरसे-पेडणे येथे झालेल्या भीषण अपघातात पुण्यातील आई व मुलगा जागीच ठार झाले. धारगळ येथे 18 वर्षीय युवक तर बांबोळी येथे 60 वर्षीय पादचारी महिला ठार झाली. ओल्ड गोवा-फेंडा मार्गावर मंगळवारी सकाळी मोठय़ाप्रमाणात तेलगळती झाल्याने अनेक वाहने घसरुन पडल्याने अनेक चालक जखमी झाले आहेत.
धारगळ येथे झालेल्या अपघातात तुषार हेमंत सरमळकर (18, धारगळ) हा युवक जागीच ठार झाला आहे. जीए-03-के-2751 क्रमांकाच्या दुचाकीवरून तो जात असताना विजेच्या खांबाला ठोकर दिल्याने जागीच ठार झाला.
बांबोळीत पादचारी महिला ठार
बांबोळी येथे एका स्विफ्ट कारने पादचारी महिलेला ठोकरल्याने तिचे निधन झाले. आगशी पोलिसांनी स्विफ्ट कारचालका विरोधात तक्रार नोंद केली आहे. ही घटना सोमवारी रात्री घडली. संशयित ब्लाझिया बार्रेटो (37, माजोर्डा) ही महिला जीए-08-एम-6221 क्रमांकाच्या स्विफ्ट कारने बांबोळीहून मडगावच्या दिशेने जात होती. बांबोळी होली क्रॉसजवळ पोचताच तिने रस्त्यातून चालत जाणारी तेरेझिना फर्नांडिस (60, पर्रा बार्देश) हिला ठोकर दिल्याने ती गंभीर जखमी झाली. आगशी पोलिसांना माहिती मिळाताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला तिला आणि गोमेकॉत दाखल करण्यात आले. उपचार चालू असताना तिचे निधन झाले.
बहुतांश अपघात होतात अतिवेगामुळे
नियमित होणाऱया वाहन अपघातांचे मुख्य कारण म्हणजे वाहनचालकांचा हलगर्जीपणा असल्याचे दिसून येत आहे. अती वेगाने वाहन चालविणे आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे यामुळेच अधिकाधिक अपघात होत असतात. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱया वाहनचालकांना दंड देण्याचे काम पोलीस करीत असतात, मात्र त्याचा काही फायदा होत नसल्याचे दिसून येत आहे. जानेवारी 22 ते आत्तापर्यंत 3 लाख 15 हजार 556 जणांना दंड ठाठावला आहे.
जनजागृतीचा विशेष परिणाम होत नाही
वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत यासाठी वाहतूक पोलीस जनजागृतीचे काम करीत असतात. जानेवारी ते आत्तापर्यंत 66 हजार 515 जणांना वाहतूक नियमांविषयी माहिती देण्याचे काम पोलिसांनी केले आहे. मात्र या सगळ्याचा म्हणावा तसा फायदा होत नाही. प्रत्येक माणसाकडे वेळ कमी असल्याने प्रत्येकाला वेगाची घाई असते आणि त्यातूनच अपघात घडत असतात. जानेवारी ते आज पर्यंत 2 हजार 201 अपघात झाले असून त्यात 169 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये अधिकाधिक युवक असल्याचेही दिसून येत आहे.
पुणेतील माता-पुत्राचे गेले प्राण
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 (गोवा-मुंबई) वर तोरसे – पेडणे येथे सरकारी हायस्कूलजवळ काल मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ट्रक व कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पुणे येथील एका कुटुंबातील आई व दीड वर्षाचा मुलगा जागीच ठार झाले. त्यांच्यासोबत घराकाम करणारी मोलकरीण गंभीर जखमी झाली आहे. या कुटुंबातील मुलगी व वडिलही जखमी झाले असून त्यांच्यावर बांबोळी येथील गोमेकॉ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
पेडणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे येथील पियुष गुंडेच्या हे त्यांची पत्नी अपूर्वा (32), दीड वर्षाचा मुलगा, एक सात वर्षाची मुलगी आणि मोलकरीण हे पाचहीजण पुणे येथून एम एच 12 टी .एस 8780 या कारमधून गोव्यात येत असताना दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास तोरसे येथील सरकारी हायस्कूलच्यासमोर हा भीषण अपघात झाला. त्यात अपूर्वा गुंडेच्या व तिचा दीड वर्षाचा मुलगा जागीच ठार झाले. समोरून के. एल. 10 ए झेड 8096 क्रमांकाचा मासे वाहतूक करणारा ट्रक आला आणि दोन्ही वाहनांची भीषण टक्कर झाली. त्यात पुणे येथील कारचा चक्काचूर झाला.
अँब्युलन्सला एक तास उशीर
या अपघातातील वरील दोन्ही जखमींना जर वेळीच आपत्कालीन सेवा उपलब्ध झाली असती तर कदाचित हे दोन्ही जीव वाचले असते. अपघात घडल्यानंतर एका तासाच्या नंतर 108 रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. तत्पूर्वी आई आणि दीड वर्षाचा मुलगा या दोघांनी प्राण सोडले होते. अत्यवस्थ असलेल्या मोलकरीणीस पोलिसांच्या वाहनातून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले.
घटनेची माहिती पेडणे पोलिसस्थानक आणि मोपा विमानतळ पोलिसस्थानक यांना मिळताच मोपा विमानतळ पोलिस निरीक्षक महेश केरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघाताचा पंचनामा केला आणि जखमींना बांबोळी येथे गोमेकॉत उपचारासाठी पाठवण्यात आले. पेडणे अग्निशामक दलाला अपघाताची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोचले. गाडीत सापडलेल्यांना पञा कापून बाहेर काढण्यात आले
रस्ता बांधकाम कंपनीमुळे अपघात
तोरसे सरकारी हायस्कूल येथे वळण (डायव्हरजन) असून राज्याबाहेरुन येणाऱया गाडय़ांना त्याचा अंदाज येत नसल्यामुळे याठिकाणी अनेक अपघात झाले आहेत. माञ सरकारी यंञणा आणि एम.व्ही आर कंपनीच्या हलगर्जीपणामुळे या रस्त्यावर आतापर्यत अनेकांचे प्राण गेले आहेत. गेले अनेक महिने हे काम सुरु आहे. पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी याबाबत काही महिन्यांपूर्वी प्रत्यक्ष भेट देऊन कंपनीला काम लवकर संपविण्याचा आदेश दिला होता.
एमव्हीआर कंपनी सरकारी जावई : तळवणेकर
पेडणे तालुका बहुजन समाजाचे अध्यक्ष उमेश तळवणेकर यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की या राष्ट्रीय महामार्गावर धारगळ ते पञादेवीपर्यंत अनेक अपघात होऊन अनेकांचे बळी गेले. माञ सरकार असंवेदनशील असून त्यांना जनतेचे काहीच पडलेले नाही. तोरसे येथे वारंवार अपघात होतात आणि याच ठिकाणी अनेकांचे बळी गेले. तरीही संबधित खाते काही उपाययोजना करत नाही. पेडणे मतदारसंघाच्या आमदारानाही एमव्हीआर कंपनी जुमानत नसून त्यांनी यापूर्वी याठिकाणी रस्त्याच्याबाबत संबंधित अधिकारी यांना पूर्व कल्पना दिली होती. आपण येत्या दिवसात आमदार प्रवीण आर्लेकर यांची भेट घेऊन रस्त्याबाबत निवेदन सादर करणार असल्याचे उमेश तळवणेकर म्हणाले. आजची ही अंत्यत दुर्दैवी घटना असून सरकारने आतातरी गांभिर्याने या रस्त्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी उमेश तळवणेकर यांनी केली आहे.









