ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात एका कारचालकासह महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर 4 महिला गंभीर जखमी आहेत. जखमी महिलांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी 9 च्या सुमारास अपघातग्रस्त कंटेनर (एमएच-46, एआर 0181) पुण्याहून मुंबईच्या दिशेनं जात होता. यावेळी चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनरने एका स्विफ्ट डिझायर कारला धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, कारचा चक्काचूर झाला. अपघातानंतर कंटेनर विरुद्ध लेनवर जाऊन पलटी झाला. यावेळी समोरून येणारी इतर 4 वाहनं बाधित झाली. या अपघातात स्विफ्ट डिझायरच्या चालकासह एका महिलेचा मृत्यू झाला. तर 4 महिला जखमी झाल्या.
अपघातानंतर पोलिसांसह स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले. कंटेनर रस्त्यावर आडवा झाल्याने मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लेनची वाहतूक विस्कळीत झाली होती. या मार्गावर संथ गतीने वाहतूक सुरू आहे. अपघातग्रस्त वाहनांना घटनास्थळावरून बाजुला केलं जात आहे.








