रायगड / प्रतिनिधी :
मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. रायगड जिल्ह्यातील माणगावजवळ आज सकाळी मारुती इस्टीलो कार आणि आयशर टेम्पोचा आज सकाळी भीषण अपघात झाला. यात आजीसह दोन नातवांचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सुनील ट्रान्सपोर्टचा आयशर टेम्पो (जीए 03 के 5990) म्हापसे (गोवा) येथून झुरळांना मारण्याचे लाल/काळे हिटचे बॉक्स घेऊन गुरुवारी (दि.6) रात्री मुंबईकडे जायला निघाला. शुक्रवारी सकाळी 6.30 वा च्या सुमारास इंदापूर गावाजवळ आला असता मुंबईकडून जाणारी मारुती इस्टीलो कार (एमएच 02 सीडी 2667) ही भरधाव वेगाने अचानक चुकीच्या दिशेला येऊन ट्रकला जोरात धडक दिली.
या अपघातात वैशाली विजय तावडे (वय 72), रिवान दर्शन तावडे (वय 3), रित्या दर्शन तावडे (वय 6 महिने) यांचा जागीच मृत्यू झाला; तर दर्शन तावडे व श्वेता दर्शन तावडे (वय 30) यांना दुखापत झाली. या अपघाताची नोंद माणगांव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.









