न्हावेली /वार्ताहर –
मुंबई-गोवा महामार्गाच्या झाराप-पत्रादेवी बायपास वर टायर फुटल्याने मळगाव जोशी मांजरेकरवाडी येथे उभा असलेला डंपर व गोव्याच्या दिशेने भरधाव जाणारा रेती वाहू दुसरा डंपर यांच्यात मागाहून जोरदार धडक बसून बुधवारी पहाटे अपघात घडला. या अपघातात मागून धडक दिलेल्या डंपरचा चालक जागीच ठार झाला आहे. ठार झालेल्या डंपर चालकाचे नाव परशूराम चिन्नी राठोड (वय 24,सध्या राहणार गुढीपूर -पिंगुळी, तालुका कुडाळ मुळ रहिवाशी हगटगौड, तालुका ताळीकोट, जिल्हा- विजापूर, कर्नाटक असे आहे.
दोन डंपरमध्ये मागाहून बसलेली ही धडक एवढी मोठी होती की उभा असलेला डंपर चक्क डिव्हायडरवर चढला व मागील डंपरचा पुढील भाग पुर्णपणे चेंदामेंदा झाला.यामुळे मागील डंपरचा चालक कॅबिन मध्ये अडकून पडला होता. त्याला सकाळी 7.30 वाजता मृतावस्थेत बाहेर काढण्यात आले. यासाठी जे. सी. बी. ची मदत घ्यावी लागली. बुधवारी पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला होता. अपघाताची माहिती मिळताच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमलेल्या स्थानिक ग्रामस्थांसह डंपर चालक-मालक यांनी मदतकार्य केले. तर सावंतवाडी पोलिसांनी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीला एका दिशेने सोडून वाहतूक नियंत्रित केली.