ताबा सुटल्याने बस उलटून दहा जखमी : सहा जण गंभीर
प्रतिनिधी/ कारवार
होन्नावर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाळेगद्दे येथील एका अवघड वळणावर टुरिस्ट बस पलटी होऊन 10 हून अधिक पर्यटक जखमी झाल्याची दुर्घटना शनिवारी सकाळी घडली. जखमींपैकी 6 पर्यटक गंभीररीत्या जखमी झाले आहेत.
या अपघाताबाबत समजलेली अधिक माहिती अशी, बेंगळूरमधील सुमारे 20 पर्यटक ट्रॅव्हल्सच्या बसमधून पुराण प्रसिद्ध गोकर्णला देवदर्शनासाठी निघाले होते. होन्नावर तालुक्यातील बाळेगद्दे येथील एका वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस उलटली. त्यामुळे बसमधील 20 पैकी 10 प्रवासी जखमी झाले. जखमींपैकी 6 पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. गंभीररीत्या जखमी झालेल्या 6 पर्यटकांना स्थानिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचारासाठी अन्य जिल्ह्यातील रुग्णालयात (उडुपी, मंगळूर) दाखल केले आहे. अन्य पर्यटक किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर होन्नावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, होन्नावर तालुक्यातील बाळेगद्दे येथे राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 वर यापूर्वीही अनेकवेळा अपघात झाले आहेत. परिणामी स्थानिकांनी अपघातस्थळी खबरदारीचे उपाय हाती घेण्याची मागणी राष्ट्रीय हमरस्ता प्राधिकरणाकडे केली आहे. तथापि, अद्यापही स्थानिकांच्या मागणीची प्राधिकरणाकडून दखल घेतलेली नाही. त्याचाच परिणाम म्हणून या अपघाताकडे स्थानिकांच्याकडून पाहिले जात आहे.









