त्वरित दुरुस्तीची मजगाव ग्रामस्थांची मागणी
बेळगाव : मजगाव येथील कन्नड प्राथमिक शाळेजवळील सर्कलमधील हायमास्टचा तुटलेल्या भागामुळे अनेक वाहनांची मोडतोड आणि अपघात होत आहेत. गेल्या दोन वर्षापूर्वी सर्कलमधील हायमास्ट पथदीप पावसाच्या वाऱ्याने तुटून पडला होता. तेव्हापासून रस्त्याच्या मधोमध मोडलेल्या खांबांचा खालील भाग रहदारीला अडथळा होत आहे आणि वारंवार अनेक अपघात होत आहेत. बुधवारी रात्री एक कार त्यावरून गेल्याने कारचे नुकसान झाले. याठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून सर्कलमधील मोडलेल्या खांबाचा भाग काढून पुन्हा त्याठिकाणी भव्य हायमास्ट पथदीप बसविण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी मजगाव ग्रामस्थांनी केली आहे.









