Maharashtra Monsoon Assembly Session : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा आहे. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसंग्रामचे विनायक मेटे यांच्या रस्ते अपघातासंदर्भात निवेदन सादर केलं आहे. यावेळी मेटेंच्या अपघाताबाबत सभागृहात चर्चा करण्यात आली. तसेच अपघात झाल्यानंतर कोणती उपाययोजना करावी यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
सभागृहात बोलताना फडणवीस म्हणाले, मेटेंच्या चालकाने ११२ नंबरला फोन केला होता. मात्र तो भांबावला होता. त्याचा अंदाज चुकल्याने मेटेंच्या वाहनाला अपघात झाला. तसेच त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी देखील सांगितले. चालकाने केलेला फोन खरा की खोटा असा प्रश्न पडला आहे. जबाबदार असणाऱ्यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याचे फडणवीसांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले, विनायक मेटेंच्या मृत्यूने एक धडा मिळाला आहे. पत्ता चुकीच्या दिल्याने त्यांचा कदाचित मृत्यू झाला. यासाठी सिस्टीम बदलण्याची गरज आहे. एकदा गेलेली व्यक्ती परत आणू शकत नाही म्हणून भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून त्यावर ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे. यासाठी अपघात झाल्यानंतर ११२ ला फोन गेल्यानंतर त्याचे थेट लोकेशन गेले पाहिजे अशी सिस्टिम करावी लागणार असल्याचे ते म्हणाले.
अपघाताच्यावेळी पोलिस हद्दीचे प्रश्न निर्माण होऊ नयेत, अद्यावत यंत्रणा वापरून अपघात रोखणं गरजेचं आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे. लवकरचं ‘एआय’ च्या मदतीने डिजीटल लोकेशन ट्रक होईल अशी सिस्टिम तयार करणार आहोत. यासाठी लवकरच ‘आयटीएमएस’ सिस्टिम तयार करणार आहोत. यामध्ये ड्रोन., सॅटोलाईटचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे अपघात कोठे झाला हे लगेच कळेल आणि अपघात झालेल्याचा जीव वाचेल असंही ते म्हणाले.
Previous Articleसहकारी संस्थांच्या कर्जावरील व्याज 10 टक्क्यांपेक्षा कमी असावे
Next Article उसगांव सर्वोदय विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात








