अन्यथा अधिवेशन काळात आंदोलन ः कर्नाटक क्षत्रिय मराठा महासंघाचा इशारा
प्रतिनिधी/ बेंगळूर
मराठा समाजाचा प्रवर्ग 3ब मधून प्रवर्ग 2अ मध्ये समावेश करावा यासह मराठा समाजाच्या विविध मागण्या डिसेंबरपर्यंत पूर्ण न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा कर्नाटक क्षत्रिय मराठा महासंघाने दिला आहे.
कर्नाटक क्षत्रिय मराठा महासंघाचे अध्यक्ष व्ही. एस. श्यामसुंदर गायकवाडा यांनी बेंगळूर येथे पत्रकार परिषद घेऊन मागण्यांसदर्भात राज्य सरकारला इशारा दिला. ते म्हणाले, राज्यात भाजपने सत्तेत आल्यानंतर मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्याची अद्याप पूर्तता झालेली नाही. यावषी डिसेंबरपर्यंत मागणी पूर्ण न झाल्यास बेळगावात होणाऱया विधिमंडळ अधिवेशनादरम्यान आंदोलन सुरू करण्यात येईल.
मराठा समाजाचा प्रवर्ग 3ब मधून प्रवर्ग 2अ मध्ये समावेश करावा, अशी मागणी आम्ही केली आहे. मराठा समाजाचा मागास प्रवर्गात समावेश करण्याच्या शिफारशी करण्यात आल्या असल्या तरी त्यावर अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. हा मराठा समाजावर अन्याय असल्याचे ते म्हणाले.
श्रीमंत पाटील यांना मंत्रिपद द्या
भाजप सरकारच्या स्थापनेला जबाबदार असलेले श्रीमंत पाटील हे येडियुराप्पा यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. त्यांना सध्याच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व न देणे चुकीचे आहे. त्यांना प्रतिनिधित्व देण्यात यावे, अशी मागणीही गायकवाड यांनी केली.









