आरसीयूचे कुलगुरु प्रा. विजय एफ. नागण्णावर यांचे प्रतिपादन : गुरु, आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी वाटचाल करण्याचा सल्ला
बेळगाव ; जय-पराजयाचा विचार न करता स्पर्धेमध्ये किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये आव्हान स्वीकारून त्यात आपला सहभाग दर्शविणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पराजयाची भीती मनात बाळगू नका. आव्हाने स्वीकारा आणि जीवनात यशस्वी व्हा, असे प्रतिपादन राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. विजय एफ. नागण्णावर यांनी विद्यार्थ्यांना केले. राणी पार्वती देवी महाविद्यालयाचा वार्षिक महोत्सव व बक्षीस वितरण समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर एडीजीपी अरुण चक्रवर्ती जी.जी., डॉ. सुधा खोकाटे, एसकेई सोसायटीचे उपाध्यक्ष प्रा. एस. वाय. प्रभू, प्राचार्य डॉ. अभय पाटील यासह मान्यवर उपस्थित होते. कुलगुरु पुढे म्हणाले, आरपीडी कॉलेजमध्ये माझे शिक्षण पूर्ण झाले. त्यावेळचे कॉलेज आणि आताच्या कॉलेजच्या परिसरामध्ये बराच बदल झाला आहे. या कॉलेजचे नाव शहरातील महाविद्यालयांमध्ये अग्रेसर असून त्याचा मला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. बक्षीस वितरण कार्यक्रमाला मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलाविलात. आज माझ्याच
कॉलेजमध्ये माझ्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस देत आहे, याचा मला अभिमान असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी समस्यांना धाडसाने सामोरे जावे, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून उपस्थित असलेले नागरी हक्क अंमलबजावणी संचालनालयाचे एडीजीपी अरुण चक्रवर्ती जी.जी. म्हणाले, सध्या लहान वयातच गुन्हे करण्याचे प्रमाण वाढले आहे. ही बाब समाजाच्यादृष्टीने घातक असल्याचे सांगितले. जीवनाला योग्य मार्गदर्शन देणारे पहिले गुरुच असतात. तेव्हा त्यांचा आदर करणे महत्त्वाचे आहे. गुरुनंतर आपले आई-वडील आणि योग्य मित्र मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी. कारण आज जे मी काही घडलो आहे ते शिक्षकांमुळेच घडलो असल्याचे त्यांनी सांगितले. मला विद्यार्थी दशेमध्ये कधीच परितोषिक मिळाले नाही. मात्र, आज माझ्याच हस्ते पारितोषिक वितरण होत आहे, हे माझ्यादृष्टीने अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
तरुणांच्या हाती देशाचे भवितव्य
बेंगळूर विद्यापीठाच्या प्रा. सुधा खोकाटे म्हणाल्या, भारत हा तरुणांचा देश आहे. त्यामुळे देशाचे भवितव्य हे तरुणांच्याच हाती आहे. तेव्हा तरुणांनी कोणत्याही प्रकारच्या जाती-धर्मामध्ये न अडकता देशासाठीच स्वत:ला झोकून द्यावे. कोणत्याही धर्माच्या विळख्यामध्ये कोणीही अडकू नका. सतत प्रयत्नशील रहा तसेच नवनवीन प्रयोग करत रहा आणि समाज व देशाच्या विकासाला हातभार लावा. नवीन तंत्रज्ञान येत आहे, त्याचा योग्यप्रकारे वापर करा. सध्या त्याचा अधिक गैरवापर होत आहे. त्यामुळे त्याचे परिणाम समाजावर होत असतात. तेव्हा कोणीही समाजविघातक कारवायांमध्ये गुंतू नका, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. प्रारंभी विद्यार्थिनी सोनाली हिने स्वागतगीत म्हटले. त्यानंतर आरपीडी कॉलेजचे प्राचार्य डॉ. अभय पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. शर्मिला संभाजी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रसन्ना जोशी यांनी कॉलेजमध्ये वर्षभर झालेले विविध कार्यक्रम, स्पर्धा यांची माहिती दिली. एसकेई सोसायटीचे व्हा. चेअरमन प्रा. एस. वाय. प्रभू यांनी अध्यक्षीय भाषण केले. त्यानंतर विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. पूजा खोकाटे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. रामकृष्ण एन., प्रसन्ना जोशी, जनरल सेक्रेटरी नुपूर रानडे, विद्यार्थी प्रतिनिधी कीर्ती रेवणकर आदी उपस्थित होते.









