भात कापणीसह रताळी काढणी, ऊस तोडणीला जोर : पाणथळ जमिनीतील भातमळणी डिसेंबरमध्ये
वार्ताहर /जांबोटी
जांबोटी-ओलमणी परिसरात गेल्या आठ दिवसापासून सुगीच्या कामांना वेग आला असून या परिसरातील शेतकरी वर्ग भात कापणी व भात मळणीच्या कामात गुंतले आहेत. तसेच ऊस तोडणीच्या कामाला देखील प्रारंभ झाल्यामुळे शेतवडीत सर्वत्र शेतकरी वर्गाची एकच लगबग सुरू झाली आहे. यावषी जून महिन्यापासूनच या परिसरात अत्यल्प पावसाने हजेरी लावल्यामुळे दुष्काळाचे सावट गडद बनले होते. अधूनमधून पडणाऱ्या तुरळक पावसामुळे भात पिकांना जीवदान मिळाले असले तरी अपुऱ्या पावसामुळे भात पिकावर प्रतिकूल परिणाम होऊन भात पिकांची वाढ खुंटली होती. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या वळीव पावसामुळे भात पिकांना काही प्रमाणात जीवदान मिळाल्यामुळे भात पिकांची पोसवणीची प्रक्रिया पूर्ण झाली. मात्र अपुऱ्या पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी झाल्याने माळरानावरील भातपिके पोसवणीनंतर वाळून गेल्याने या भागात यावर्षी दुष्काळी परिस्थिती उद्भवली आहे. त्यातच या परिसरात गवे व अन्य जंगली प्राण्यांच्या उपद्रवामुळे देखील ऐन सुगीच्या हंगामातच भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने यावर्षी भात उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्मयता वर्तवण्यात येत आहे. गेल्या आठ दिवसापासून या परिसरातील शेतकरी वर्गाने सुगीच्या कामांना प्रारंभ केला आहे. सध्या माळरानावरील भात कापणी व मळणीच्या कामांना एकाचवेळी प्रारंभ झाल्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. पाणथळ शेतवडीतील भात कापणी व मळणीच्या कामांना डिसेंबर महिन्यात प्रारंभ होणार असून या भागातील सुगीचा हंगाम किमान एक महिना तरी चालण्याची शक्मयता आहे. कामे वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी शेतकरी वर्गाची एकच धावपळ सुरू झाली आहे.
ऊस तोडणी – रताळी काढणीलाही सुऊवात
या परिसरातील ओलमणी, दारोळी, निलावडे, कुसमळी, हब्बनहट्टी आदी गावातील मलप्रभा नदीकाठावरील तसेच कारगिळी नाला परिसरातील शेतवडीत शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन घेतो. यावर्षी पावसाअभावी ऊस उत्पादनात देखील घट होण्याची शक्मयता आहे. सध्या या भागात देखील शेतकरी वर्गाने ऊस तोडणीच्या कामाला प्रारंभ केला असून महाराष्ट्र व इतर ठिकाणांहून ऊस कामगारांच्या टोळ्या परिसरात डेरेदाखल झाल्या आहेत. भात कापणी, मळणी व ऊस तोडणीबरोबर रताळी काढणीलाही वेग आला आहे.









