दमदार पावसामुळे बळीराजा सुखावला-रताळी : भुईमूग, बटाटे पिकासाठी नांगरटीची कामे सुरू
वार्ताहर /जांबोटी
जांबोटी-ओलमणी परिसरात गेल्या आठ दिवसांपासून दमदार वळीव पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे पावसामुळे ऊस, मिरची आदी पिकांना जीवदान मिळाले आहे. हा पाऊस पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना उपयुक्त ठरला असून पावसामुळे या भागातील बळीराजा सुखावला आहे. या परिसरात एप्रिल महिन्यात एक-दोन हलक्या स्वरुपाच्या वळीव पावसाने हजेरी लावली होती. मात्र सदर पाऊस पेरणीपूर्व मशागतीच्या कामांसाठी कुचकामी ठरल्यामुळे या भागातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत होते. परंतु महिन्याभराच्या कालावधीपर्यंत या भागात वळीव पावसाने पाठ फिरविल्यामुळे वातावरणात निर्माण झालेला उष्मा तसेच कडक उन्हाच्या झळांमुळे या भागातील ऊस, मिरची आदी पिके करपून जात होती. तसेच नदी, विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्यामुळे शेतकरी वर्ग चातकाप्रमाणे पावसाच्या प्रतीक्षेत होते. अपेक्षेप्रमाणे गेल्या आठ दिवसांपासून या परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकरी वर्गात समाधान पसरले आहे.
ऊस, मिरची पिकाला जीवदान
या पावसामुळे या भागातील प्रमुख नगदी पीक असलेल्या ऊस, मिरची पिकाला जीवदान मिळाले आहे. तसेच पेरणीपूर्व मशागतीच्या कामासाठी शेतवडीत आवश्यक ओलावा निर्माण झाल्यामुळे सध्या या भागातील शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला प्रारंभ केला आहे. सध्या भातरोप लागवडीसाठी आवश्यक असलेल्या तरु पेरणीसाठी जमिनीची नांगरट तसेच माळरानावरील जमिनीत रताळी, भुईमूग, बटाटे आदी पिकासाठी आवश्यक असलेल्या नांगरटीची कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने करण्यात येत आहेत. पावसामुळे विहिरी, कूपनलिका आदींच्या पाणीपातळीत देखील वाढ झाल्यामुळे काही प्रमाणात पाणीटंचाई दूर होण्याची शक्यता आहे. तसेच मुबलक पावसामुळे जनावरांना हिरवा चारादेखील उपलब्ध होणार असल्यामुळे या परिसरातील बळीराजा सुखावला आहे.
पावसामुळे उन्हाळी मिरची पिकाचे नुकसान
जांबोटी परिसरात शेतकरी वर्ग उन्हाळी मिरची (गि•ाr)चे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात. सध्या मिरची उत्पादनाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. मात्र या परिसरात गेल्या आठ दिवसांपासून नियमित वळीव पाऊस हजेरी लावत असल्यामुळे शेतवडीत पिकलेली मिरची वाळविण्याच्या कामात पावसामुळे अडथळा येत असून काढलेली मिरची घरातच पडून असल्यामुळे ती कुजण्याची शक्यता असल्यामुळे या भागातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
पावसामुळे शेती मशागतीच्या कामात शेतकरी व्यस्त
खानापूर तालुक्यात रविवारी दमदार पाऊस झाला. त्यामुळे शेतवडीत ओलावा निर्माण झाला आहे. आता शेती मशागतीच्या कामात शेतकरी व्यस्त झाला आहे. तर तालुक्याच्या पूर्वभागात काही प्रमाणात पाऊस झाला होता. तेथील शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त झाले आहेत. एकंदरीत शेतकऱ्यांच्या अपेक्षाप्रमाणे पाऊस झाल्याने येत्या पंधरा दिवसात पेरणीची कामे पूर्णत्वाकडे येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण पसरले आहे. खानापूर तालुक्यात 36 हजार हेक्टर जमिनीत भाताची लागवड करण्यात येते. त्यापैकी 28 ते 30 हजार हेक्टर जमिनीत भाताची पेरणी केली जाते. तर उर्वरित जमिनीत भाताची लागवड करण्यात येते. जांबोटी, कणकुंबी, शिरोली वगळता इतर भागात भातपेरणी करण्यासाठी धांदल सुरू होते. तर जांबोटी, कणकुंबी, शिरोली भागात जून महिन्याच्या उत्तरार्धात मोठ्या पावसात भाताची लागवड केली जाते. खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदीकाठच्या शेतवडीत तसेच पूर्वभागात ज्यांच्याकडे कूपनलिका आहेत असे शेतकरी उसाची लागवड करतात. तर उर्वरित जमिनीत भाताचे पीक घेतले जाते. भात हे खानापूर तालुक्यातील प्रमुख पीक आहे. नंदगड, हलशी, कापोली नागरगाळी, कुंभार्डा, लोंढा, गुंजी, नेरसा, करंबळ, खानापूर, इदलहोंड, रामगुरवाडी, गर्लगुंजी, तोपिनकट्टी, बरगाव, लोकोळी, चापगाव, बिडी, कक्केरी, भुरुणकी, गोधोळी आदी भागात प्रामुख्याने भाताचे पीक घेतले जाते. त्यामुळे या भागातील शेतकरी गेल्या महिन्याभरापासून पावसाच्या प्रतीक्षेत होते.यावर्षी आठवडाभर अगोदर पावसाला सुरुवात झाल्याने मशागतीची कामे वेळेत होणार आहेत. पूर्वी मशागतीची कामे बैलजोडीच्या सहाय्याने केली जात होती. अलीकडे अनेक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर आणले आहेत. ट्रॅक्टरद्वारे मशागतीची कामे करण्यात येतात. तर अलीकडच्या चार-पाच वर्षात ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणी केली जात आहे. त्यामुळे बैलजोडी पाळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी होत गेली.









