जाफरवाडी, देवगिरी, गुंजेनहट्टी गावातील विकासकामे मार्गी लागल्याने ग्रामस्थांत समाधान
वार्ताहर /कडोली
गेल्या काही महिन्यात कडोली ग्राम पंचायत क्षेत्रातील कडोली, जाफरवाडी, देवगिरी आणि गुंजेनहट्टी गावात विकास कामांना खीळ बसली होती. सांडपाण्यांनी गटारी तुडूंब भरल्या होत्या. अस्वच्छतेच्या अभावामुळे अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले होते. शिवाय आपापल्या वॉर्डात विकासकामे आणि स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी निधी मिळत नव्हता. यामुळे काही ग्रा. पं. सदस्य नाराज होते. याच नैराश्येपोटी काही ग्रा. पं. सदस्यांनी वेगळा गट निर्माण करून सागर पाटील यांना अध्यक्षपदी तर दीपा मरगाळे यांची उपाध्यक्षपदी निवड केली. या नूतन अध्यक्ष-उपाध्यक्षांनी हाती सत्ता घेताच विकास कामांना जोरदार सुरुवात केल्याने ग्रामस्थांत समाधान व्यक्त होत आहे.
लिफ्टइरिगेशन योजना सुरू
पहिल्यांदा गाव स्वच्छता मोहीम हाती घेऊन कडोली, जाफरवाडी, देवगिरी, गुंजेनहट्टी येथे तुंबलेल्या गटारी, रस्त्याच्या बाजूला असलेली घाण दूर करण्यात आली. त्यानंतर विहिरीना पाणी मुबलक प्रमाणात यावे या उद्देशाने भरम तलाव ते मार्कंडेय नदी ही बंद पडलेली लिफ्टइरिगेशन योजना तातडीने दुरूस्त करून सुरू केली. शिवाय शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा व्हावा, यासाठी ग्रा. पं. च्यावतीने संबंधीत खात्याला निवेदन देऊन मागणी करण्यात आली. तर दोन वर्षापासून कासवगतीने जलमिशन घरोघरी नळपाणी योजनेचे काम कधी मार्गी लागणार तसेच ग्रामसभा कधी बोलाविणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
ग्रामसभा लवकरच घेणार
गेल्या पाच वर्षापासून कडोली ग्राम पंचायतीची ग्रामसभा झाली नाही. त्यामुळे ग्रामस्थांची घुसमट होत आहे. ग्रामस्थांना शासकीय योजनांची माहिती मिळत नाही. शिवाय गावात जलमिशनसारख्या ज्या योजना रेंगाळत चालल्या आहेत. त्यांना चालना देण्याचा प्रयत्न होईल. शिवाय ग्रामसभा लवकर बोलाविण्यात येईल, अशी प्रतिक्रिया अध्यक्ष सागर पाटील आणि उपाध्यक्षा दीपा मरगाळे यांनी व्यक्त केली आहे.









