माळरानावर शेतीकामात बळीराजा दंग : शेणखत टाकणे, नांगरट करणे
प्रतिनिधी/ बेळगाव
दोन दिवसापूर्वी झालेल्या वळीव पावसाने शेतीकामांना वेग आला आहे. विशेषत: माळरानावर नांगरट आणि शेणखत टाकण्याची कामे सुरू झाली आहेत. वळीव लांबणीवर पडल्याने शेतीकामे थांबली होती. आता काही प्रमाणात पाऊस झाल्याने कामांना वेग येऊ लागला आहे. खरीप हंगाम जवळ आल्याने वेळेवर पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली आहे.
कृषी खात्यानेदेखील खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बी-बियाणे, खते उपलब्ध केली आहेत. मे अखेरच्या आठवड्यात काही ठिकाणी धूळवाफ पेरणी केली जाते. तर जून सुरुवातीपासून पेरणीला प्रारंभ होतो. त्यामुळे शेतीकामे केली जात आहेत. विशेषत: बेळगाव तालुक्यात खरीप हंगामामध्ये भात, बटाटा, भुईमूग, सोयाबीन, ज्वारीची पेरणी केली जाते. त्यामुळे भात आणि भुईमूग बियाणांदेखील मागणी अधिक असते.
एप्रिल महिन्यात वळीव पावसाने दडी मारली होती. त्यानंतर मे महिन्यातदेखील पहिल्या आठवड्यात पाऊस झाला नाही. आता थोड्याफार प्रमाणात वळीव झाला आहे. त्यामुळे शेतीकामात शेतकऱ्यांची वर्दळ वाढली आहे. शेतकऱ्यांनी भात शेतीबरोबर इतर माळरानावरदेखील शेती कसण्याची कामे हाती घेतली आहेत. विशेषत: माळरानावर भुईमूग, बटाटा आणि रताळी वेलीची लागवड केली जाते. यासाठी ट्रॅक्टर आणि बैलजोडीच्या सहाय्याने नांगरटीचे काम सुरू झाले आहे.
खरीप हंगाम जवळ आल्याने शेती कसण्याबरोबर बी बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशकांसाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली आहे. वेळेत हंगाम साधण्यासाठी बी बियाणे जुळवाजुळवदेखील केली जात आहे. विविध जातींची भात बियाणे अलीकडे पेरणीसाठी वापरली जात आहेत. मात्र बी बियाणे कृषी खात्याकडून मिळत नसल्याने शेतकऱ्यांना खासगी दुकानातून विकत घ्यावी लागत आहेत. त्यामुळे आर्थिक फटकादेखील बसू लागला आहे.
मागील दोन वर्षात जिल्ह्dयातील एकूण पेरणी क्षेत्र वाढले आहे. समाधानकारक पाऊस होत नसल्याने एकूण पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे. मागीलवर्षी रासायनिक खताचे दर वाढले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना जादा पैसे मोजावे लागले होते. खताचे वाढलेले दर अद्याप स्थिर आहे. त्यामुळे यंदादेखील शेतकऱ्यांना फटका बसणार आहे.









