खासदार जगदीश शेट्टर यांची मुख्यमंत्री, नगरविकास मंत्र्यांकडे मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
हलगा व बेळगाव परिसरातील ग्रामीण भागात भुयारी गटारीतील पाण्याचे शुद्धीकरण करण्याचा प्रकल्प उभारण्याचे काम मागील दोन वर्षांपासून म्हणजे 2023 पासून स्थगित आहे. या कामाला अद्याप सुरुवात झालेली नसल्याने खासदार जगदीश शेट्टर यांनी तीव्र असंतोष व्यक्त केला आहे.
प्रस्तूत भुयारी गटारीच्या पाण्याचा प्रकल्प स्थापन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भूसंपादनाची प्रक्रिया 2013 पासून पूर्ण झाली आहे. मात्र नव्याने भूसंपादन कायदा 2013 प्रमाणे जमीन मालकांना नूतन कायद्यानुसार परिहारधन मिळालेले नाही. संबंधित जमीन मालकांना अधिक परिहारधन किंवा विशेष निधी देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नगरविकास खात्याच्या सचिवांना (बेंगळूर) यापूर्वीच प्रस्ताव पाठविला आहे. बेळगाव शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. येथे भुयारी गटारीच्या पाण्याचा शुद्धीकरण प्रकल्प स्थापनेला विलंब होत असल्याने शहरातील अनेक भागांमध्ये गटारीचे पाणी रस्त्यावर येते. त्यामुळे जनतेला दुर्गंधीशी सामना करावा लागतो आहे.
केंद्र सरकारच्या ‘अमृत’ योजनेंतर्गत अंदाजे 162.73 कोटी खर्चातूत ही योजना कार्यान्वित होणार आहे. योजनेसाठी भूसंपादन करून जमीन मालकांना जादा परिहारधन किंवा विशेष परिहारधन देण्याची प्रक्रिया त्वरित पूर्ण व्हावी. त्यामुळे योजनेला गती मिळेल, अशी मागणी खासदार जगदीश शेट्टर यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या व नगरविकास मंत्री भैरती सुरेश यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.









