आशिया चषकातील चार सामने पाकमध्ये, तर उर्वरित श्रीलंकेत आयोजित करण्याचा प्रस्ताव
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांच्या अध्यक्षतेखालील आशियाई क्रिकेट मंडळ (एसीसी) आता पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष नजम सेठी यांचा भारतीय संघाचा समावेश नसलेले आशिया चषक स्पर्धेतील चार सामने पाकिस्तानमध्ये आयोजित करण्याचा ‘हायब्रीड मॉडेल’चा प्रस्ताव स्वीकारू शकते. उर्वरित सामने श्रीलंकेत गॉल आणि पल्लेकेले येथे खेळविले जातील.
‘एसीसी’ यासंदर्भात मंगळवारी औपचारिक घोषणा करण्याची शक्यता आहे. एकदा ‘हायब्रीड मॉडेल’ अधिकृतपणे स्वीकारल्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तान संघाला भारत दौऱ्यावर येण्याचे मार्ग मोकळे होतील. त्यानंतर पाकिस्तानला अहमदाबादमध्ये खेळण्यातही कोणतीही अडचण येणार नाही.
‘एसीसी’च्या कार्यकारी मंडळाचे एक आदरणीय सदस्य असलेले ओमान क्रिकेट मंडळाचे प्रमुख पंकज खिमजी यांच्याकडे यावर तोडगा काढण्याची जबाबदारी देण्यात आली होती. कारण बहुतेक देशांना ‘हायब्रीड मॉडेल’ नको अशी परिस्थिती आहे. पण आता भारतीय संघाचा समावेश नसलेले चार सामने म्हणजे पाकिस्तान विऊद्ध नेपाळ, बांगलादेश विऊद्ध अफगाणिस्तान, अफगाणिस्तान विऊद्ध श्रीलंका आणि श्रीलंका विऊद्ध बांगलादेश या लढती लाहोरच्या गदाफी स्टेडियमवर होतील. भारत व पाकिस्तान यांच्यातील सामने आणि इतर सर्व ‘सुपर फोअर’ सामने एक तर पल्लेकेले किंवा गॉल येथे आयोजित केले जातील, असे एसीसी मंडळाच्या एका सदस्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर बोलताना सांगितले आहे.
आशिया चषक स्पर्धा सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘आयसीसी’चे सीईओ जोफ अॅलार्डिस आणि अध्यक्ष ग्रेग बार्कले हे सेठी यांना भेटण्यासाठी कराचीला गेले होते तेव्हा आयोजनाचा हक्क असल्याकारणाने पाकिस्तानमध्ये आशिया चषक स्पर्धेचे चार सामने आयोजित केले, तर बदल्यात पाकिस्तान विश्वचषक स्पर्धेतील सहभागासाठी कोणत्याही अटी ठेवणार नाही, असे ठरले होते.
पाकिस्तानशिवाय स्पर्धा खेळावी लागल्यास प्रसारणाचे हक्क घेतलेल्या कंपन्यांनी ठरलेल्या रकमेच्या निम्मी रक्कम दिली असती. कारण तशा परिस्थितीत भारत-पाक सामन्यांना त्यांना मुकावे लागले असते. या स्पर्धेत दोन भारत-पाक सामने होणार असून जर दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचले, तर त्यात आणखी एकाची भर पडेल. त्यामुळे वरील उपाय सर्वांत व्यवहार्य दिसत होता. कारण यामुळे आता पाकिस्तान कोणत्याही अटीविना भारतात येईल. एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेचे बहुप्रतीक्षित वेळापत्रक पुढील आठवड्याच्या सुरुवातीला जाहीर केले जाणार आहे. विश्वचषकात भारताचा अहमदाबादमध्ये पाकिस्तानशी सामना होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचे उर्वरित सामने चेन्नई आणि हैदराबादमध्ये होऊ शकतात.