16 कोटीच्या अंमली पदार्थ तस्करीसंबंधी कारवाई
\ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राजस्थानातील अजमेर जिल्हय़ाच्या अतिरिक्त डीएएसपी दिव्या मित्तल यांच्यावर एबीसीने मोठी कारवाई केली असून सोमवारी अजमेर येथील दोन ठिकाणांवर तसेच उदयपूर, झुनझुनू आणि जयपूर येथे अनेक ठिकाणी छापा घालण्यात आला आहे. एकंदर पाच स्थानी एकाचवेळी कारवाई करण्यात आली आहे.
मित्तल यांच्यावर दोन कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आणि ती देण्यासाठी तक्रारदारावर दबाव आणल्याचा आरोप आहे. या लाचेचा संबंध 16 कोटी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करी प्रकरणाशी आहे. या प्रकरणातील तक्रारदार निर्दोष असतानाही त्याचे नाव दोषी म्हणून तक्रारीत न समाविष्ट करण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती, असा आरोप करण्यात आला आहे.
मित्तल यांच्या जयपूर येथील सदनिकेवर त्यांच्या उपस्थितीतच धाड टाकण्यात आली आहे. त्याचवेळी अन्य चार ठिकाणहीही कारवाई करण्यात आली. या कारवाईत काय हाती लागले हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी मोठे पुरावे हाती लागल्याची सूत्रांची माहिती आहे. मित्तल यांनी मात्र, ही कारवाई म्हणजे बनाव असल्याचा आरोप केला आहे. आपल्याला गोवण्यासाठी अंमली पदार्थांच्या तथाकथित तस्करीचे कुभांड रचण्यात आले, असा दावा त्यांनी केला आहे. मे 2021 मध्ये मित्तल यांनी 16 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले होते. जयपूर आणि अजमेर येथून हे पदार्थ जप्त केल्याचा दावा करण्यात आला होता. तथापि, या प्रकरणी एफआयआर सादर करताना काही आरोपींकडून लाच मागण्यात आली होती. काही जणांचा या अंमली पदार्थांशी कोणताही संबंध नसतानही त्यांचा संबंध जोडण्याची धमकी देऊन लाच मागण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.









