प्रतिनिधी /पणजी
कला अकादमीने 2021 – 22 या वर्षात आयोजित केलेल्या मराठी ‘अ’ व ‘ब’ गट नाटय़स्पर्धा, तियात्र ‘अ’ गट स्पर्धा, राज्या कलाप्रदर्शन (आर्टिस्ट व विद्यार्थी विभाग) तसेच कोंकणी नाटय़स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार, दि. 21 मे रोजी सायं. 4.00 वा मा. दत्ताराम सभागृह, राजीव गांधी कला मंदिर, फोंडा येथे संपन्न होणार आहे. गोव्याचे कला व संस्कृती मंत्री व कला अकादमीचे अध्यक्ष . गोविंद गावडे हे या समारंभाला प्रमुख पाहुणे तसेच प्रख्यात नाटय़कर्मी विजय केंकरे हे खास निमंत्रित म्हणून उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहे.
नाटय़कर्मी विजय केंकरे यांचा अल्प परिचय
विजय केंकरे हे नाटय़निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते म्हणून सुपरिचित आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेक एकांकिका, व्यावसायिक तसेच प्रायोगिक मराठी व हिंदी नाटके दिग्दर्शीत करुन आपल्या अभिनयाचा कसदार परिचय करुन दिलेला आहे. अनेक दूरदर्शन मालिका तसेच नाटके त्यांनी दिग्दर्शीत केलेली आहे. दिग्दर्शन, अभिनय यासाठी श्री केकंरे यांना असंख्य पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यांत प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य पुरस्काराबरोबरच वसंत सोमण पुरस्कार, सहयोग फाऊंडेशन पुरस्कार, चैत्रचाहूल, गोवा सरकार, लक्ष्मीकांत बेर्डे, मैत्रेय फाऊंडेशन आणि अलिकडेच कोकण फिल्म फेस्टिवल व आचार्य अत्रे पुरस्कार त्याना प्राप्त झाला आहे. संगीत नाटक अकादमी, राष्ट्रीय नाटय़ विद्यालय नवी दिल्ली, नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टंस मुंबई, ललित कला केंद्र, पुणे, मुंबई विद्यापीठाचा नाटय़ विभाग व कला अकादमी गोवा या प्रतिष्ठेचा संस्थांशी ते संलग्न असून नाटय़प्रशिक्षण, नाटय़कार्यशाळा आदी माध्यमातून श्री. केंकरे हे सातत्याने नाटय़विषयक मार्गदर्शन करीत आहेत.
सदर समारंभाला जोडून महाराष्ट्र राज्य नाटय़स्पर्धेतील 2019-20 या वर्षी प्रथम पारितोषिक विजेत्या रुद्रेश्वर पणजी, या संस्थेचा पालशेतची विहीर या नाटकाचा प्रयोग सायं. 6.30 वा सादर होणार आहे. हे नाटक विजयकुमार नाईक यांनी लिहीले असून प्रा. दीपक आमोणकर हे या नाटकाचे दिग्दर्शक आहेत.
या समारंभाच्या आयोजनासाठी राजीव गांधी कला मंदिर, फोंडा यांचे सहकार्य लाभले असून सदर समारंभास पारितोषिक विजेते, नाटय़ व कलारसिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कला अकादमीने केले आहे.









