संसदेत प्रस्ताव आणण्याची पत्राद्वारे मागणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बांगलादेशात हिंदू समुदायाविरोधात सातत्याने हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. हिंदूंच्या घरांबरोबरच मंदिरांनाही लक्ष्य केले जात आहे. शेजारच्या देशात अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर आता हिंदूंवरील या हिंसाचाराच्या विरोधात विविध शैक्षणिक तज्ञ आणि इतिहासकारांनी आवाज उठवला आहे. या जाणकार लोकांनी भारतीय संसदेला खुले पत्र लिहून हिंसाचाराच्या विरोधात ठराव मांडण्याची मागणी केली आहे.
अनेक तज्ञांनी सरकारला लिहिलेल्या खुल्या पत्रात भारतीय संसदेला हिंदूंवरील हिंसाचाराच्या विरोधात ठराव आणून हल्ले थांबवण्यास सांगितले आहे. यामध्ये गुन्हेगारांना लवकर अटक करण्याची मागणीही करण्यात आली आहे. बांगलादेशातील हिंदू समुदायावर होत असलेल्या वाढत्या हिंसाचार आणि दडपशाहीबद्दल सर्व स्वाक्षरीकर्त्यांनी तीव्र चिंता व्यक्त करण्यासाठी हे पत्र लिहिले आहे, असेही या पत्रात म्हटले आहे. अलीकडील घटनांनी या प्रदेशातील हिंदूंवरील प्राणघातक हल्ल्याच्या नवीन आणि धोकादायक पॅटर्नकडे लक्ष वेधले आहे.
मेहेरपूरमधील इस्कॉन मंदिराची जाळपोळ, देशभरातील अनेक हिंदू मंदिरांची तोडफोड आणि हिंदूंच्या लिंचिंगचे प्रकार बांगलादेशात घडले आहेत. ह्या घटना अत्यंत अस्वस्थ करणाऱ्या आहेत. बांगलादेशातील हिंदू लोकांना वारंवार अत्याचाराला सामोरे जावे लागते हे दु:खद असल्याचेही या पत्रात म्हटले आहे. तेथे राजकीय अस्थिरता असताना हिंसाचार वाढतो. 1971 मध्ये बांगलादेशची निर्मिती झाल्यापासून पाकिस्तानी राजवटीने लाखो हिंदूंची हत्या केली आहे, असे दाखलेही पत्रातून देण्यात आले आहेत.









