शैक्षणिक नववर्षारंभ : रांगोळी, फुगे, भेटवस्तू अन् पुस्तकेही : शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
बेळगाव : पावणेदोन महिन्यांनंतर शाळेची घंटा वाजली आणि चिमुकल्यांचा किलबिलाट सुरू झाला. शाळेचा पहिला दिवस असल्याने मित्रमैत्रिणींना भेटण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये ओढ होती. शाळेत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. काही शाळांमध्ये फुले देऊन तर काही शाळांमध्ये आरती ओवाळून विद्यार्थ्यांचे स्वागत झाले. शुक्रवारी नव्या शैक्षणिक वर्षारंभी पावसाने थोडीफार उसंत घेतल्याने पालक आणि विद्यार्थ्यांना शाळेला पोहोचणे सुकर झाल्याने विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळा आवारांना ‘बहर’ आल्याचे दिसून येत होते. शुक्रवारपासून नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला. त्यामुळे सरकारी शाळांमध्ये आकर्षक पद्धतीने सजावट करण्यात आली होती.
काही ठिकाणी फुगे तर काही ठिकाणी केळीच्या पानांनी सजावट करण्यात आली. शाळेच्या प्रांगणात रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या. शाळेत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांना आरती ओवाळून त्याचबरोबर एखादी भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांसह पालकांचेही स्वागत करण्यात आले. तसेच शैक्षणिक वर्षात राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. याचदरम्यान शाळेच्या पहिल्या दिवसाचे क्षण मोबाईलबद्ध करण्यासाठी विद्यार्थी व पालक फोटो काढतानाही दिसून येत होते. कणबर्गी येथील हायर प्रायमरी शाळेमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार असिफ सेठ, जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ, महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, शहर गटशिक्षणाधिकारी रवी बजंत्री यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासोबतच त्यांना मान्यवरांच्या हस्ते पाठ्यापुस्तकांचे वितरण करण्यात आले.
पहिल्याच दिवशी पाठ्यापुस्तके-गणवेश
शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यापुस्तके व गणवेश दिला जाईल, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार गुरुवारी सायंकाळपर्यंत 90 टक्के शाळांना पाठ्यापुस्तके व गणवेश वितरण करण्यात आले. त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी दोन जोड गणवेश तसेच विषयानुरूप पाठ्यापुस्तके विद्यार्थ्यांना देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावणारा नव्हता. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांकडून गोड पदार्थांचे वितरण करण्यात आले. पहिल्याच दिवसापासून मध्यान्ह आहार देण्यास सुरुवात करण्यात आली. शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांना काही ठिकाणी मिठाई तर काही ठिकाणी शिरा व इतर पदार्थ वितरण करण्यात आले. त्याचबरोबर अंडी व केळी यांच्याही वितरणाला शुक्रवारपासून प्रारंभ करण्यात आला.
विद्यार्थी शाळेवर…, शिक्षक गणतीवर…
नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असली तरी सरकारी शाळांमधील अनेक शिक्षक जातनिहाय जनगणनेसाठी बाहेर असल्याचे दिसून आले. अद्याप जनगणनेचे काम पूर्ण झाले नसल्याने शुक्रवारीही त्यांना या कामावर जुंपण्यात आले. काही शाळांमध्ये दोन ते तीनच शिक्षक कार्यरत असताना त्यापैकी दोन शिक्षक जनगणनेसाठी बाहेर असल्याने केवळ एकाच शिक्षकाला विद्यार्थ्यांचे स्वागत करावे लागले. जनगणनेची प्रक्रिया अतिशय किचकट असल्याने विलंब होत असून याचा परिणाम शिक्षणावर होणार असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.









