केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितिन गडकरी यांची घोषणा : ट्रकचालकांना खूशखबर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ट्रक ड्रायव्हिंगला देशातील सर्वात अवघड पेशांपैकी एक म्हटले गेल्यास चुकीचे ठरणार नाही. उन्हाळा असो किंवा हिवाळा किंवा पावसाळा प्रत्येक ऋतूत ट्रकचालक सलग कित्येक तास ट्रक चालवत असतात. उन्हाळ्यात ट्रकचालकांसाठी स्थिती अधिकच प्रतिकूल असते. ट्रकचालकांचा हाच त्रास लक्षात घेत केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितिन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. वाहननिर्मात्यांना लवकरच ट्रकचालकांच्या केबिनमध्ये एअर कंडिशनरची व्यवस्था करावी लागणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 2025 पासून सर्व ट्रक केबिन एसी म्हणजेच वातानुकूलित असणार आहेत. संबंधित कंपन्यांना ट्रकनिर्मितीच्या स्वरुपात बदल करण्यासाठी आवश्यक कालावधी देण्यात आला आहे.
दिवसातील 12 तासांहून अधिक काळ काम करणाऱ्या ट्रकचालकांना यामुळे मोठा आराम मिळणार आहे. काम करण्याची अवघड स्थिती आणि दीर्घकाळापर्यंत ड्रायव्हिंग केल्याने चालकाला येणारा थकवा हा दुर्घटनांसाठी कारणीभूत असल्याचे मानले जाते. तसेही वोल्वोसारख्या कंपन्या यापूर्वीच ट्रकसाठी एसी केबिन निर्माण करत आहेत.
ट्रकचालकांच्या केबिनमध्ये एसीची व्यवस्था करणे कंपन्यांसाठी अनिवार्य ठरणार अशा निर्णयाच्या फाइलवर मी आज स्वाक्षरी केली आहे. आमचे ट्रकचालक 43 अंशापेक्षा अधिक तापमानात ड्रायव्हिंग करत असतात आणि आम्हाला या चालकांच्या स्थितीची कल्पना असायला हवी. केंद्रीय मंत्रिपद स्वीकारल्यावर ट्रकचालकांसाठी एसी केबिन सादर करण्याची माझी इच्छा होती. परंतु काही लोकांनी या निर्णयाला विरोध करत ट्रकनिर्मितीचा खर्च वाढणार असल्याचा दावा केला होता. परंतु आता सर्व ट्रक केबिन एसीने युक्त असावेत, यासंबंधीच्या निर्णयाच्या फाइलवर मी स्वाक्षरी केली आहे असे गडकरींनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे.

2025 पासून दिसू लागतील एसी ट्रक
भारतात चालकांची कमतरता आहे, याचमुळे ट्रकचालक दिवसातील 14-16 तास ड्रायव्हिंग करत असतात. अन्य देशांमध्ये एका ट्रकचालकाने कितीवेळ ड्रायव्हिंग करावे हे निश्चित आहे. अशा स्थितीत भारतात ट्रकचालकांना सुविधा पुरविणे गरजेचे ठरते. याचमुळे एसी ट्रक लवकरच बाजारात दिसू लागतील असे गडकरींनी म्हटले आहे. 2025 पर्यंत एसी केबिन असलेले ट्रक बाजारात उपलब्ध होतील असे मानले जात आहे.
वाहतूक क्षेत्राची मोठी भूमिका
देशाच्या वाहतूक क्षेत्रात चालकांची मोठी भूमिका असते. भारत हा वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेपैकी एक असल्याने वाहतूक क्षेत्राचे मोठे महत्त्व आहे. अशा स्थितीत ट्रकचालकांच्या काम करण्याची स्थिती आणि मनोस्थितीला संबोधित करणे आवश्यक आहे. गडकरींच्या हस्ते मंगळवारी ‘देश चालक’ नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे. हे पुस्तक भारतीय चालकांना सन्मान देण्यासाठी लिहिण्यात आले आहे. ट्रकचालक अत्याधिक उष्णतेच्या स्थितीत काम करत आहेत. चालकांच्या कामाच्या स्थितीत सुधारणा करण्याची गरज आहे. अधिक ड्रायव्हिंग स्कूल्स स्थापन करून चालकांची कमतरता दूर करण्यासाठी पावले उचलली जावीत असे गडकरींनी म्हटले आहे.
वाहतूक खर्च कमी करणे गरजेचे
भारतातील वाहतूक खर्च अन्य देशांच्या तुलनेत अधिक आहे. चीनमध्ये वाहतूक खर्च 8-10 टक्के आहे. युरोपीय देशांमध्ये हे प्रमाण 12 टक्के आहे. तर भारतात हा आकडा 14-16 टक्के इतका आहे. देशाला अधिक निर्यात करायची असल्यास वाहतूक खर्च कमी करावा लागणार असल्याचे गडकरींनी म्हटले आहे.









