बेळगाव : गरीब, तसेच मध्यमवर्गीय जनता ही बससेवेवर अवलंबून आहे. परंतु, राज्य सरकारने कोणताही विचार न करता बसभाड्यात 15 टक्के वाढ केली. यामुळे सर्वसामान्यांवर वाढीव बोजा पडणार असून सरकारच्या या कृतीविरोधात सोमवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे आरपीडी चौक येथे आंदोलन करण्यात आले. नोकरी, व्यवसाय, शिक्षणानिमित्त नागरिक बसने ये-जा करीत असतात. प्रवाशांची संख्या पाहता बसची संख्या अत्यल्प आहे. शक्ती योजनेमुळे बसची संख्या वाढविली जात नसल्यामुळे शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना याचा फटका बसत आहे. ये-जा करण्यासाठी विद्यार्थ्यांना दररोज कसरत करावी लागत आहे. याबद्दल राज्य सरकार कोणताही विचार करताना दिसत नाही. परंतु, अचानकपणे बसभाड्यात 15 टक्क्यांनी वाढ करण्यात आली. भाडेवाढीविरोधात सोमवारी अभाविपने मोर्चा काढला. यावेळी राज्य सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. आरपीडी परिसरातील विद्यार्थी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. यावेळी जिल्हा संघटन विभागाचे सचिव सचिन हिरेमठ, शहर सचिव रोहित आलकुंटे, शुभम घोडगेरी, प्रशांत शेल्लीकेरी, मंजुनाथ हंचिनमनी यांच्यासह इतर उपस्थित होते.
पोलिसांशी वादावादी…
वाढीव बसभाडेविरोधात अभाविपने आरपीडी चौक येथे साखळी आंदोलन करण्यास सुरुवात केली. परंतु, स्थानिक पोलिसांनी रहदारीचे कारण देत चौकामध्ये आंदोलन करू नये, रस्त्याच्या एका बाजूला आंदोलन करा, अशा सूचना केल्या. परंतु, आंदोलक चौकामध्येच आंदोलन करण्याबाबत ठाम राहिल्याने कार्यकर्ते व पोलिसांमध्ये वादावादी झाली. अखेर पोलिसांनी आंदोलन करण्यास सहमती दिल्याने वाद निवळला.









