विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्याची मागणी
बेळगाव : शक्ती योजनेमुळे महिला प्रवाशांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. मात्र, त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. ग्रामीण भागातून दररोज हजारो विद्यार्थी बसमधून प्रवास करत शहरातील शाळा-महाविद्यालयांना येत असतात. मात्र, मुळातच बस कमी आणि त्यासुद्धा महिला प्रवाशांनी भरून जात असल्याने विद्यार्थ्यांना बसप्रवास करणे कष्टप्रद होत आहे. परिवहन मंडळाने लवकरात लवकर बस संख्या वाढवावी व विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी, अशा मागणीसाठी अ. भा. विद्यार्थी परिषदेने गुरुवारी आंदोलन केले. कोल्हापूर सर्कलमध्ये अभाविपच्या नेतृत्वाखाली शेकडो विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या वर्गांसाठी, परीक्षेसाठी वेळेवर शाळा-कॉलेजमध्ये पोहोचणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात मुळातच बसफेऱ्या कमी आहेत. सध्या येत असलेल्या बसमध्ये महिलांची लक्षणीय गर्दी होत असल्याने विद्यार्थ्यांना उभे राहण्यासाठीसुद्धा जागा मिळत नाही, अशी परिस्थिती आहे, असे निवेदनात म्हटले आहे. परिवहन मंडळाने त्वरित ग्रामीण भागात बस सुविधा वाढवाव्यात व लवकरात लवकर विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी. अथवा विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या बसेसची सोय करावी, अशी मागणी परिषदेने केली आहे. या आंदोलनासाठी प्रीतम उपरी, रोहित हुमणाबादीमठ, शिवानंद बिज्जरगी, रोहित अलकुंटे, प्रशांत शिगीहळ्ळी, अभिषेक कोरीशेट्टी, प्रज्ज्वल यांनी पुढाकार घेतला.









