चन्नम्मा चौकात रास्ता रोको : काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
बेळगाव : पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरताना येणाऱ्या तांत्रिक त्रुटी दूर कराव्यात. विद्यार्थ्यांच्या शुल्कातील तफावत दूर करावी. अधिकाधिक बससुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने सोमवारी चन्नम्मा सर्कल येथे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी रास्ता रोको केल्यामुळे अखेर अभाविपच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. बेळगावच्या राणी चन्नम्मा विद्यापीठासह इतर सर्व विद्यापीठांमध्ये शैक्षणिक शुल्क भरताना अनेक तांत्रिक त्रुटींमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
युयुसीएमएस या वेबसाईटवरून अर्ज भरताना अनेक तांत्रिक अडचणी आल्याने विद्यार्थ्यांचे अर्ज विद्यापीठाकडे जमा झाले नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला बसताना अडचणी येणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारने या तांत्रिक त्रुटी दूर करण्याची मागणी करण्यात आली. शक्ती योजनेमुळे अनेक भागामधील बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. याचा फटका शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसत आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी राज्य सरकारने अधिक बस उपलब्ध करून द्याव्यात. अन्यथा राज्यभर आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी कुशल घोडगेरी, सचिन हिरेमठ, प्रितम हुपरी, मंजुनाथ हंचिनमनी, यल्लाप्पा बोम्मनहळ्ळी, प्रथमेश पाटील, दर्शन हेगडे, विश्व हिरेमठ यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलीस-आंदोलकांमध्ये झटापट
जोवर राज्याचे उच्चशिक्षणमंत्री आंदोलनस्थळी येणार नाहीत, तोवर जागेवरून हलणार नाही, अशी भूमिका अभाविप कार्यकर्त्यांनी घेतली. यामुळे पोलीस व आंदोलकांमध्ये बराच काळ शाब्दिक चकमक उडाली. परंतु, अभाविपचे कार्यकर्ते रास्ता रोकोवर ठाम राहिल्याने पोलिसांनी आंदोलकांना हटविण्याचा प्रयत्न केला. यामुळे झटापट होऊन काही काळ गोंधळ निर्माण झाला. अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.









