विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत 42 पैकी 23 कौन्सिलर जागा जिंकल्या
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या (जेएनयू) विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (एबीव्हीपी) ऐतिहासिक कामगिरी नोंदविली आहे. विद्यापीठाच्या अंतर्गत येणारी 16 महाविद्यालये आणि विविध संयुक्त केंद्रांमधील एकूण 42 कौन्सिलर जागांपैकी 23 जागांवर ऐतिहासिक विजय मिळवला आहे. कोणत्याही प्रतिस्पर्धी विद्यार्थी संघटनेच्या तुलनेत हे मोठे यश आहे. बदलाची ही लाट आणल्याबद्दल एबीव्हीपीने जेएनयूच्या सर्व जागरुक विद्यार्थ्यांचे आभार मानले आहेत.
जेएनयूमध्ये डाव्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या स्कूल ऑफ सोशल सायन्सेसमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने 25 वर्षांनंतर दोन जागा जिंकून ऐतिहासिक बदलाचे संकेत दिले आहेत. त्याचप्रमाणे, डाव्या प्रभावाचे एक प्रमुख केंद्र असलेल्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमध्येही अभाविपने दोन जागा जिंकत एक नवीन राजकीय प्रवाह स्थापन केला.
निवडणूक प्रक्रियेच्या सुरुवातीपासूनच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आपली मजबूत दावेदारी दाखवून दिली होती. विविध ठिकाणच्या कौन्सिलच्या उमेदवारांनी कौन्सिलर पदांवर बिनविरोध विजय मिळवला आहे. स्कूल ऑफ बायोटेक्नॉलॉजीच्या एकमेव जागेवर सुरेंद्र बिश्नोई, स्कूल ऑफ संस्कृत अँड इंडिक स्टडीजच्या तीन जागेवर प्रवीण पियुष, राजा बाबू आणि प्राची जयस्वाल आणि स्पेशल सेंटर फॉर मॉलिक्युलर मेडिसिनच्या एका जागेवर गोवर्धन सिंह यांची बिनविरोध निवड झाली आहे. याशिवाय, केंद्रीय पॅनेलच्या चारही महत्त्वाच्या जागांवरही सुरुवातीपासूनच आघाडी कायम ठेवली होती. एबीव्हीपीच्या या कामगिरीमुळे जेएनयूमध्ये विद्यार्थी परिषदेची व्यापक स्वीकृती आणि विद्यार्थ्यांचा त्यावर असलेला विश्वास सिद्ध होतो, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
…ही तर बदलाची लाट!
एबीव्हीपी जेएनयू युनिटचे अध्यक्ष राजेश्वर कांत दुबे यांनी या यशाबाबत आपली प्रतिक्रिया देताना आता जेएनयूएसयूने घेतलेल्या निर्णयांमध्ये एबीव्हीपीला महत्त्वाचे स्थान मिळू शकेल, असा आशावाद व्यक्त केला. हा विजय अभाविपच्या रूपात त्या सकारात्मक बदलाचा विजय आहे. राष्ट्रवाद, शैक्षणिक उत्कृष्टता आणि विद्यार्थी हितासाठीच्या आपल्या संघर्षाचे हे फळ आहे. भविष्यातही, आम्ही कॅम्पसला राष्ट्र उभारणी आणि विद्यार्थी कल्याणासाठी प्रयोगशाळा बनवण्यासाठी पूर्ण समर्पणाने काम करत राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.









