चन्नम्मा चौकात रास्ता रोको, पोलिसांसोबत झटापट
बेळगाव : बेळगाव येथे झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एका पोलीस अधिकाऱ्यांवर हात उगारला. ही घटना राज्यातील नागरिकांसाठी निषेधार्ह असून या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) मंगळवारी राणी चन्नम्मा चौकात आंदोलन छेडण्यात आले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात जोरदार घेषणाबाजी करत त्यांचे फोटो जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. काँग्रेसच्यावतीने सोमवारी बेळगावच्या सीपीएड मैदानावर महागाई विरोधात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपच्या काही महिला कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. यामुळे संतापलेल्या मुख्यमंत्र्यांनी थेट पोलीस अधिकाऱ्याला व्यासपीठावर बोलावून हात उगारला. आधिच राज्यामध्ये काँग्रेसचे मंत्री व कार्यकर्त्यांकडून अधिकाऱ्यांना मानसिक त्रास दिला जात आहे. त्यातच आता मुख्यमंत्र्यांनीही अधिकाऱ्यावर हात उगारला असून याची त्यांनी माफी मागावी, अशी मागणी अभाविप कार्यकर्त्यांनी केली.
अर्धा तास वाहतूक कोंडी
चन्नम्मा चौक येथे अर्धातास आंदोलन करण्यात आले. यामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी मध्यस्थी करत काही वाहने मार्गस्थ केली. त्यानंतर चन्नम्मा चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत घोषणा देत रॅली काढण्यात आली. कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन राज्यातील गुंडगिरी थांबवा, अशी मागणी केली. यावेळी कुशल गोदीगेरी, प्रथमगौडा पाटील, सचिन हिरेमठ, यल्लाप्पा, प्रज्वल, दर्शन यासह इतर उपस्थित होते.
पोलीस-कार्यकर्त्यांमध्ये झटापट
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केलेल्या कृतीचा निषेध व्यक्त करण्यासाठी कार्यकर्ते जमले होते. त्यांनी चक्काजाम करण्यासोबतच टायर पेटवून त्यामध्ये सिद्धरामय्या यांचा फोटो जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी फोटो काढून घेतले. यामुळे कार्यकर्ते व पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. या बरोबरच जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांनी रोखले. यामध्ये पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली. यामध्ये काही कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले.









