ऑनलाईन टीम / तरुण भारत :
अश्लील रॅप साँग शूट प्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक झाली आहे. रॅपरवर कारवाई करण्याची मागणी करत अभाविपने आज विद्यापीठात प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठकही उधळून लावली. यावेळी विद्यापीठातील काही वस्तूंची तोडफोड करण्यात आल्याचीही माहिती समोर येत आहे.
शुभम जाधव नावाच्या तरुणाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात एक अश्लील रॅप साँग शूट केलं होतं. या रॅप साँगवरुन राज्यात चांगलाच गोंधळ झाला होता. या रॅपरवर कारवाई करण्याची मागणीही होत होती. अशातच आता अभाविपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अभाविपने आज विद्यापीठात प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत रॅपर शुभम जाधववर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी विद्यापीठात सुरू असलेली वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठकही त्यांनी उधळून लावली.
दरम्यान, या रॅपरवर यापूर्वीच चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यापीठाकडूनही या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. याबाबत एका महिन्यात अहवाल दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.