पंतप्रधान मोदींनी काँग्रेस-राजदला फटकारले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बिहारमधील दरभंगा येथे 27 ऑगस्ट रोजी राहुल गांधी यांच्या ‘मतदार हक्क यात्रे’दरम्यान पंतप्रधान मोदींच्या आईला उद्देशून शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर सातव्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी उत्तर देत काँग्रेस आणि राजदला कडक शब्दात फटकारले. पंतप्रधानांनी मंगळवारी भावनिक आणि आक्रमक पद्धतीने राजद-काँग्रेसवर हल्लाबोल केला. ‘मोदी तुम्हाला एकदा माफ करतील, पण भारताची भूमी कधीही आईचा अपमान सहन करणार नाही’ असे पंतप्रधान म्हणाले. माझ्या आईला केलेली शिवीगाळ हा देशातील असंख्य माता-भगिनींचा अपमान असल्याचेही त्यांनी ठणकावले.
बिहारच्या 20 लाख महिलांसाठी जीविका निधी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह युनियनच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि राजदवर हल्लाबोल केला. याप्रसंगी त्यांनी आपल्या दिवंगत आईच्या अपमानाचा मुद्दा उपस्थित केला. जीविका निधीच्या उद्घाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. याप्रसंगी बिहार ही अशी भूमी आहे जिथे महिलांचा आदर केला जातो, जिथे गंगा मैय्या, कोसी मैय्या आणि छठी मैय्या यांची पूजा केली जाते आणि जिथे जानकी जी सारख्या मुली जन्माला येतात. अशा बिहारमध्ये तिच्या आईवर अत्याचार झाला, जो केवळ तिच्यासाठीच नाही तर देशातील प्रत्येक आई, बहीण आणि मुलीसाठी अपमान आहे, असे ते म्हणाले.
पंतप्रधान भावुक
कार्यक्रमप्रसंगी बोलत असताना पंतप्रधान भावनिक झाले. माझी आई 100 वर्षे वय पूर्ण केल्यानंतर जग सोडून गेली आणि तिचा राजकारणाशी काहीही संबंध नव्हता. तरीही, राजद-काँग्रेसच्या व्यासपीठावरून तिच्याविरुद्ध अपशब्द बोलले गेले. प्रत्येक आई आपल्या मुलांना तपस्येने वाढवते, परंतु काही लोक हे कधीही समजू शकत नाहीत. देशाने एका गरीब आईच्या मुलाला आशीर्वाद देत प्रधानसेवक बनवले आहे. हेच माझे यश काही ‘नामदार’ पचवू शकत नाहीत, असे मोदी म्हणाले.
बिहारमधील लोक आपल्या आईचा अपमान करणाऱ्यांना माफ करणार नाहीत, असे सांगतानाच महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरण हे एनडीए सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे मोदींनी सांगितले. बिहारमध्ये राजदच्या राजवटीत महिलांना सर्वाधिक अत्याचार आणि असुरक्षितता सहन करावी लागल्याचा आरोपही पंतप्रधानांनी केला.









