वृत्तसंस्था / लंडन
एअर इंडिया या भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान कंपनीच्या एका महिला कर्मचाऱ्यावर लंडन येथील एका हॉटेलात अत्याचार करण्यात आला आहे. ही घटना येथील रॅडीसन रेड या तारांकित हॉटेलात शनिवारी घडली. यासंबंधी तेथील पोलिसांकडे तक्रार सादर करण्यात आली आहे. या हॉटेलात भारतीय महिला विमान कर्मचाऱ्यांना त्रास देण्यात येतो. त्यांचा समाजकंटकांकडून पाठलाग करण्यात येतो, अशा तक्रारी पूर्वीपासून आहे. तथापि, हॉटेल प्रशासनाने या तक्रारींकडे दुर्लक्ष चालविले आहे, असे भारतीय कर्मचाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
सदर महिला कर्मचारी आपल्या खोलीत रात्री झोपली असताना, हॉटेलच्या की कार्डचा उपयोग करुन कोणीतरी खोलीचा दरवाजा उघडला आणि आत प्रवेश केला. त्याने झोपलेल्या महिला कर्मचाऱ्याला मारहाण केली. तसेच अपशब्दांचा उपयोग केला. मारहाणीमुळे महिलेच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. तिने आरडाओरड केल्याने बाजूच्या खोलीतील ग्राहकांनी धावत येऊन तिची हल्लेखोरापासून सुटका केली. तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचाही हल्लेखोराचा हेतू होता, असे दिसून येत असल्याचे नंतर स्पष्ट करण्यात आले आहे.
कर्मचारी मुंबईत परतली
हल्ला करण्यात आलेल्या महिला कर्मचाऱ्यावर लंडन येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. नंतर ती भारतात मुंबईला परतली. भारताकडून या प्रकारासंबंधात गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली असून भारताच्या लंडन येथील उच्चायोग निवासाने या प्रकरणाचा पाठपुरावा लंडन येथील स्थानिक पोलिस आणि तेथील प्रशासन यांच्याकडेही चालविला आहे. मात्र, अद्याप हल्लेखोराविरोधात कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असे समजते. गेले वर्षभर या हॉटेलात भारतीय विमान कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करण्यात येत आहे. हॉटेलच्या व्यवस्थापनाने अद्याप सुरक्षा व्यवस्था चोख बनविलेली नाही. भारतीय महिला कर्मचाऱ्यांच्या खोल्यांचे दरवाजे रात्री बेरात्री वाजविण्यात येतात, अशा तक्रारीही आहेत.









