आईपासून एक महिन्याच्या बाळाची केली ताटातूट : सामाजिक कार्यकर्त्या आवदा व्हिएगश यांचा आरोप
प्रतिनिधी /मडगाव
‘लीव्ह इन रिलेशन’मधून जन्माला आलेल्या एका बाळाला, आईच्या स्तनपानापासून दूर ठेवण्यात आले. कायद्याचे रक्षणकर्ते म्हणून कर्तव्य बजावणारे पोलीसही या बेकायदेशीर कृत्यात सहभागी आहेत, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या आवदा व्हिएगश यांनी केला. सदर बालकाला तातडीने आईच्या स्वाधीन करण्याची मागणी केली आहे. दक्षिण गोव्याच्या ‘चाईल्ड वेल्फेअर कमिटी’ने आई व बाळाची ही ताटातूट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली असल्याचा आरोप व्हिएगश यांनी मडगावात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत केला. कारण कोणतेही असले तरी जन्मजात बाळाला आईपासून दूर करताच येत नाही. 29 नोव्हेंबर 2022 रोजी हा प्रकार घडला. अवघ्या एक महिन्याच्या बाळाला पोलिसांच्या सहकार्याने या बाळाला आईपासून दूर नेण्यात आले. शेल्टर होममध्ये फक्त चार दिवसांसाठी म्हणून नेण्यात आलेल्या या प्रकरणातील 24 वर्षीय तरूणीला 25 जानेवारीपर्यंत बाळापासून ताटातूट करून ठेवण्यात आली आहे. तिला देऊ केलेल्या मोफत वकिलाशी संपर्क करण्यास देण्यात येत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. वकिलाशी चर्चा करण्यासाठी चाईल्ड वेल्फेअर कमिटीकडून रितसर परवानगी घेऊन येण्याची तंबी या तरूणीला देण्यात आल्याचे यावेळी सांगितले.
कायदे करु शकत नाही
चाईल्ड वेल्फेअर कमिटी ही 18 वर्षांवरील युवतींसाठी कायदे करू शकत नाही. ही कमिटी 18 वर्षांखालील मुलांसाठी नियम करू शकते. प्रस्तुत प्रकरणातील तरूणी ही 24 वर्षाची आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली मार्गदर्शक तत्वे बाजूला सारून चाईल्ड वेल्फेअर कमिटी आपले स्वतःचे कायदे बनवत असल्याचा आरोप यावेळी आवदा व्हिएगश यांनी केला आहे.
पोलीस हस्तक्षेप नको!
नवजात बाळाला, बाळाच्या आईच्या स्वाधीन करण्यात यावे, आपल्यावरील आरोप काय आहे याचे कारण तिला सांगण्यात यावे. न्यायालयाचा आदेश घेऊन आलेल्या एका व्यक्तीकडून ते पत्र न स्वीकारणाऱया चाईल्ड वेल्फेअर कमिटीच्या संबंधित कर्मचाऱयावर कारवाई करण्यात यावी आणि सदर तरूणी गुन्हेगार नसल्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी हस्तक्षेप करू नये अशी मागणी यावेळी आवदा व्हिएगश यांनी यावेळी केली.









