प्रतिनिधी,कोल्हापूर
Kolhapur Crime News : इन्स्टाग्रामवरून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी बेळगांव येथील तरुणास जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली.जुबेर वजीर गिरगावान (वय -23, रा. उज्ज्वलनगर, बेळगाव, कर्नाटक) असे त्याचे नाव आहे. पिडीत तरुणीने याबाबतची फिर्याद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापुरातील 21 वर्षांची तरुणी आणि बेळगावातील चप्पल दुकानात काम करणारा सेल्समन जुबेर यांची दोन महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर ओळख झाली. जुबेर ज्या दुकानात कामाला होता, तेथील फोटो काढून तो तरुणीस सोशल मीडियावर पाठवून या दुकानाचा मी मालक असल्याचे सांगत होता. त्यातून त्यांच्यात घनिष्ठ संबंध निर्माण झाले.
तरुणी त्याला भेटण्यासाठी बेळगावला गेली होती.ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.जुबेरने तिला लग्नाचे आमिष दाखवले.तरुणीने जुबेरला कोल्हापुरातील घरात बोलावून घेतले.तरुणीचे आई-वडील बाहेर गेल्याचे पाहून जुबेरने त्या तरुणीवर अत्याचार केला.बेळगावला गेल्यानंतर त्याने तरुणीशी संबंध तोडले.जुबेर लग्न करण्यास तयार नाही, त्याचे आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात जुबेरविरोधात तक्रार दाखल केली.पोलिसांनी मंगळवारी दुपारी त्याला अटक करून कोल्हापुरात आणले.बुधवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.पोलीस निरीक्षक सतीशकुमार गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.









