वाहनधारकांना सहज उपलब्ध होणारी दारू ठरतेयं अपघाताचे कारण
प्रतिनिधी/ गोडोली
राष्ट्रीय महामार्गाच्या लगत डिमार्ट ते खिंडवाडीपर्यंत नियम धाब्यावर बसवून अनेक हॉटेल्स उभी राहिली आहेत. यात मांसाहारी हॉटेल जास्त असून तिथे बेकायदेशीर दारु विक्री होत असूनही ना उत्पादन शुल्क विभाग ना पोलिसांकडून कारवाई होत नाही. पैकी ‘मार्तंड’ कृपेने ‘निसर्ग’च्या सानिध्यात दारुच्या नशेत ‘मेजवानी’त रंगून जाणारी ‘मानसं’ हॉटेल्समध्ये खाणारांपेक्षा पिणाऱयांची जास्त गर्दी असते. याठिकाणी वाहन धारकांना सहज दारू उपलब्ध होत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढू लागले असून राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक की पोलीस अधीक्षक यावर कारवाई क़धी करणार याची प्रतिक्षा लागली आहे.
खिंडवाडी ते लिंबखिंडीपर्यंत राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सेवा रस्त्याला खेटून अनेकांनी हॉटेल व्यवसाय सुरू केले आहेत. यात शुध्द शाकाहारी सोडून असलेल्या मांसाहारी हॉटेलमध्ये बेकायदेशीर दारु उपलब्ध होत असल्याने खाणाऱयांपेक्षा पिणायांची गर्दी होते. इथे ‘मार्तंड’ कृपेने ‘निसर्ग’च्या सानिध्यात दारुच्या नशेत ‘मेजवानी’त रंगून जाणारी ‘मानसं’ मोठी वर्दळ करतात.
महामार्गालगत असलेल्या सेवा रस्त्याला विना परवाना खेटून उभी राहिलेल्या या हॉटेलमधील दारु वाहनधारकांना सहज उपलब्ध होत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढू लागल्याचे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी ‘तरुण भारत’ शी बोलताना सांगितले.
मांसाहारी हॉटेल तिथे दारू उपलब्ध
बेकायदेशीर दारु विक्री करणाऱया हॉटेलवर उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. मात्र आजपर्यंत एकवेळ ही दारू विक्री करणाऱया या हॉटेलवर कारवाई केलेली नाही. उलट या दोन्ही विभागाचे अधिकारी, कर्मचारी हे टेबलावर आणि अंधाऱया खोलीत ग्लास रिचवताना दिसतात.









