वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेड (आरआरव्हीलएल) आणि अबूधाबी इन्वेस्टमेंट अथॉरिटी (एडीआयए)यांच्यामध्ये एक मोठा खरेदी करार झाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. रिलायन्स रिटेलने सांगितले की अबूधाबी इन्वेस्टमेंट अथॉरिटीची सहकारी कंपनी मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या रिटेल क्षेत्रामध्ये 4967 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या नव्या गुंतवणूकीनंतर रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेडचे मूल्य पाहता देशातील चार आघाडीवरच्या कंपन्यांमध्ये नोंदले जाणार आहे.
अबूधाबीची वाढली हिस्सेदारी
अबूधाबी इन्व्हेस्टमेंट अथोरिटीला या गुंतवणुकीच्या माध्यमातून रिलायन्स रिटेल वेंचरमध्ये 0.59 टक्के इतकी हिस्सेदारी मिळणार आहे. एकंदर या खरेदी करारानंतरची रिलायन्समधील हिस्सेदारी 1.2 टक्केने वाढून 1.79 टक्के इतकी होणार आहे. मागच्याच महिन्यात रॉयटरच्या अहवालात रिलायन्स 20 हजार 780 कोटी रुपयांची उभारणी करण्यासाठी जागतिक स्तरावरील कंपन्यांसोबत चर्चा करत असल्याचा उल्लेख करण्यात आला होता.
रिलायन्स रिटेल वेंचर लिमिटेड ही जगातील 53 वी सर्वात मोठी रिटेल कंपनी आहे. रिलायन्स फ्रेश, स्मार्ट सुपरस्टोअर, स्मार्ट बाजार, स्मार्ट पॉइंट, फ्रेशपिक, 7-इलेव्हन, रिलायन्स ज्वेल, रिलायन्स डिजिटल या नावाने कंपनीची स्टोर्स देशभरात सुरु आहेत. याखेरीज फॅशन व लाइफस्टाइलसंबंधीच्या क्षेत्रात रिटेल ट्रेंडस, ट्रेंडस वुमन, ट्रेंडस मेन, ट्रेंडस फुटवियर, अवंट्रा बाय ट्रेंडस, सेंट्रो, हॅमलीज, गॅप अरमानी, बरबेरी, डिझेल अशा विविध क्षेत्रात व्यवसाय कंपनी करते.
देशात 18 हजारपेक्षा जास्त स्टोअर्स
रिलायन्स रिटेलची देशभरात मिळून 7 हजारपेक्षा जास्त शहरात एकंदर 18 हजारपेक्षा जास्त स्टोअर्स असून इ-कॉमर्समध्ये कंपनीची वाटचाल चांगली राहिली आहे.









