तालुका म. ए. समिती युवा आघाडीत नाराजी
वार्ताहर / हिंडलगा
येथील हुतात्मा स्मारक या ठिकाणी म. ए. समिती युवा आघाडीतर्फे चंदगड–आजरा मतदार संघाचे नवनिर्वाचीत आमदार शिवाजी पाटील यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. या सत्कारासाठी बेळगाव व खानापूर तालुक्यातील समितीप्रेमी लोक, आजी–माजी लोकप्रतिनिधी व मराठीप्रेमी जनता उपस्थित होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष मनोहर किणेकर उपस्थित होते.
परंतु आमदार शिवाजी पाटील यांना एका महत्त्वाच्या बैठकीसाठी दिल्ली येथे जावे लागल्याने या ठिकाणी अनुपस्थित राहिले. त्यामुळे सवून नाराजी पसरली होती. तरी आपला प्रतिनिधी म्हणून चंदगड पंचायत समितीचे माजी सभापती यशवंत सोनार यांना आमदार शिवाजी पाटील यांनी याठिकाणी पाठविले होते.
प्रथम आमदार मनोहर किणेकर यांनी प्रास्ताविक मनोगत करून उपस्थितांचे स्वागत केले. उपस्थितांचा परिचय म. ए. समिती युवा आघाडीचे अध्यक्ष राजू किणेकर यांनी करून दिला.
याप्रसंगी प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले यशवंत सोनार यांचा शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ, पानविडा देवून सत्कार केला. याप्रसंगी उपस्थित मान्यवर व इतरांच्या हस्ते हुतात्मा स्मारकाचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी म. ए. समितीचे नेते प्रकाश मरगाळे, युवा नेते आर. एम. चौगुले व मनोहर किणेकर यांनी विचार मांडले. एम. जी. पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी म. ए. समिती युवा आघाडीने परिश्रम घेतले. उपाध्यक्ष शंकर कोणेरी यांनी सूत्रसंचालन केले.









