म्हसवड :
पैशाची फसवणूक प्रकरणातील सुमारे सहा वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला म्हसवड पोलिसांनी सिनेस्टाईलने जेरबंद केले.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पैशाची फसवणूक केल्याप्रकरणी नवी मुंबई येथील बेलापूर प्रथम न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी श्रीमती डी. एस. उपाध्याय यांनी २०१८ मध्ये माण तालुक्यातील भालवडी येथील बाळासाहेब नामदेव काटे यांना दोषी ठरवत तीन महिने साधी कारावास व सात लाख ५३ हजार ७५० रुपये दंड भरण्याची शिक्षा सुनावली होती. बाळासाहेब काटे तेव्हापासून फरार होते. पोलीस त्यांचा शोध घेत होते.
म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या पथकाला फरार आरोपी बाळासाहेब काटे आपल्या मूळगावी माण तालुक्यातील भालवडी येथे रहात असल्याची माहिती मिळाली होती. शुक्रवार १४ रोजी धुलिवंदनाच्या दिवशी अक्षय सोनवणे व इतर कर्मचाऱ्यांनी वेशांतर करून बाळासाहेब काटे यास ताब्यात घेतले. त्याला म्हसवड पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर मुंबई बेलापूर पोलिसांच्या ताब्यात काटे यास देण्यात आले. सिनेस्टाईल केलेल्या कारवाईबाबत जिल्हा पोलीस प्रमुख, अप्पर जिल्हा पोलीस प्रमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, अमर नारनवर, सुरेश डांगे, जगन्नाथ लुबाळ, मैना डांगे, अभिजीत भादुले, सतीश जाधव, योगेश सूर्यवंशी, भारकर गोडसे, राहुल थोरात, दया माळी, पूनम जाधव यांचे अभिनंदन केले.








