बॅग, वह्या-पुस्तके, वॉटर बॅगची रेलचेल
► प्रतिनिधी/ बेळगाव
शैक्षणिक वर्षाला येत्या 29 मेपासून प्रारंभ होणार आहे. त्यामुळे बाजारात शालेय साहित्य खरेदीची लगबग पाहायला मिळत आहे. पालक, विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक साहित्य खरेदीला पसंती दिली जात आहे. त्यामुळे शालेय साहित्य विक्रीच्या दुकानांमध्ये व स्टेशनरीमध्ये गर्दी होऊ लागली आहे. शिवाय शैक्षणिक वर्ष जवळ आल्याने दुकाने शैक्षणिक साहित्यांनी सजू लागली आहेत.
शहरातील पांगुळ गल्ली, गणपत गल्ली, मारुती गल्ली, मेणसी गल्ली, भेंडीबाजार, कडोलकर गल्ली आदी ठिकाणी शैक्षणिक साहित्य खरेदीची रेलचेल पाहावयास मिळत आहे. विशेषत: बॅग आणि स्टेशनरी दुकानांमध्ये खरेदीला वेग आला आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षात शैक्षणिक वर्ष विस्कळीत झाले होते. त्यामुळे शैक्षणिक साहित्याची खरेदी थंडावली होती. मात्र, यंदा शैक्षणिक वर्षाला सुरळीत प्रारंभ होणार आहे. त्यामुळे शैक्षणिक साहित्याची खरेदी वाढू लागली आहे.
बाजारात पालक आणि विद्यार्थ्यांकडून वह्या, पेन, पुस्तके, कंपासपेटी, रंग, बॅग, वॉटर बॅग आदी साहित्याची खरेदी होऊ लागली आहे. मागील दोन-चार वर्षात वह्या, कंपासपेटी आणि इतर साहित्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे जादा पैसे मोजावे लागत आहेत. विशेषत: वह्यांच्या दरात भरमसाट वाढ झाली आहे. त्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांसमोर अडचणी वाढू लागल्या आहेत.
येत्या आठ-दहा दिवसात शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होत आहे. त्यामुळे शाळेत लागणाऱ्या वस्तू खरेदीसाठी पालक व विद्यार्थ्यांची धडपड सुरू आहे. लहान वर्गातील विद्यार्थी बॅग, कंपासपेटी खरेदीवर भर देऊ लागले आहेत. वरच्या वर्गातील विद्यार्थी बॅग, वह्या आणि पुस्तके खरेदी करू लागले आहेत. त्याचबरोबर पावसाळा तेंडावर आल्याने विद्यार्थी रेनकोट आणि छत्रीची खरेदी करू लागले आहेत.









