संतोष पाटील,कोल्हापूर
साधारणपणे एप्रिल- मे महिन्यात बाजार व्यापून टाकणारा आंबा यंदाच्या वर्षी बाजारातून आताच गायब झाला आहे. वातावरणातील बदलामुळे आंबा उत्पादनात साधारण 60 टक्के घट झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत आंब्याच्या दरात सरासरी 30 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात आंब्याचा गोडवा कमी होणार असल्याची खंत खवय्यात आहे.
बाजारात सर्वात प्रथम कर्नाटकातील बदामी आंब्याचे आगमन होते. यानंतर पाठोपाठ दशेरी, केसर हजेरी लावतात. दशेरीचे फळ पाकिस्तान, नेपाळ आणि उत्तर भारतात पिकते. नीलम खूप उशिरा म्हणजे हापूस संपत आल्यावर बाजारात येत असल्यामुळे आंबाप्रेमी त्याच्यावर तुटून पडतात. यादरम्यान कोकणातून फळांच्या राजाचे आगमन होते. देवगड, रत्नागिरी हापूस कोल्हापूर बाजारात येतो. एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा म्हणजे सर्वांना मनसोक्तपणे आंबा खरेदी योग असतो. देशभरातून आंब्याची आवक होते आणि दरही आवाक्यात आल्याने घरोघरी आंब्याचा गोडवा दरवळतो. यंदाच्या वर्षी मात्र आवक कमी आणि चढ्या दराने आंबा खरेदी हातच राखूनच होत आहे.
आंबा हा फक्त जिव्हेचे चोचले पुरवत नसून शरीरासाठीही अत्यंत गुणकारी आहे. मुख्य म्हणजे बलवर्धक आहे आणि पोटाच्या अनेक विकारांवर उपायकारक आहे. आंबा खाल्ल्यामुळे शरीराला व्हिटॅमिन अ, इ, उ, ए आणि ड मिळतं. आंब्यात मँगीफेरीन नावाचे अँटिऑक्सिडंट असतं, तसंच पोटॅशियम आणि मॅग्नेशियममुळे हृदयसंबधी रोग होण्याची शक्यता कमी असते. आणि हो, हे सर्व गुण असल्यामुळे आंब्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी वाढते. आयुर्वेदानेही आंबा श्वास, त्वचा आणि आमाशयासाठी उपयुक्त मानला आहे. पारंपरिक वैद्यकशास्त्रानुसार क्षयरोगाच्या उपचारासाठी पिकलेले आंबे अतिशय उपयुक्त असल्याचे म्हटले आहे.
जगातील एकूण आंबा उत्पादनापैकी 70 टक्के उत्पादन भारतात घेतले जाते. 1 ते 2 टक्के फळावर प्रक्रियाकेली जाते. आंब्याला मोहर येण्याची प्रक्रिया साधारणपणे डिसेंबर महिन्याच्या अखेरीस सुरू होते. ही प्रक्रिया मार्च महिन्यापर्यंत सुरू राहते. पण दरवर्षी उत्पादित होणाऱ्या आंब्यापैकी सुमारे 40 टक्के आंबा निरनिराळया कारणांमुळे वाया जातो. जवळपास 58 ते 59 टक्के आंबा बाजारात येतो. यंदाच्या वर्षी मोहर येण्याच्या वेळेस लागणारे पोषक वातावरण नव्हते. अवकाळी पाऊस, कडक उन्हाळा, कधी कडक थंडी तर मध्येच उष्ण वातावरण अशा विचित्र वातावरणीय परिणामाने आंबा उत्पादन घटल्याने तज्ञ सांगतात.
पाच लाख टन उत्पादनाची क्षमता
जगात दरवर्षी जवळजवळ 300 दशलक्ष टनांपेक्षा जास्त फलोत्पादन होते. सद्य:स्थितीत फलोत्पादनात भारताचा प्रथम क्रमांक लागतो. वाढत्या लोकसंख्येची फळांची गरज भागविण्यासाठी आपल्याला फलोत्पादन 45 दशलक्ष टनांपर्यंत वाढविणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात 2021-22 साली फळबाग लागवडखाली एकूण अंदाजे 5,12,547 हेक्टर क्षेत्र होते त्यातून अंदाजे 82,69,988 मेट्रिक टन उत्पादन झाले. राज्यात 1.82 लाख हेक्टर आंबा लागवडीखालील क्षेत्र आहे. त्यापासून 5 लाख टन आंबा उत्पादन घेतले जाते. राज्यात बहुतांश भागात आंबा लागवड होत असली यातील 90 टक्के उत्पादन हे कोकणातून होते. हापूस, पायरी, रत्ना, सिंधू, केसर, राजपुरी आणि वनराज यासारख्या आंब्याच्या प्रजातींचे उत्पादन कोकणातून केले जाते. यातील हापूस आंब्याला देशविदेशातून मोठी मागणी आहे. यंदाच्या वर्षी तब्बल 40 ते 60 टक्के उत्पादन घटल्याचे आकडेवारी सांगते.
यंदाच्या वर्षी तुलनेत आंबा कमीच
मागील काही वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीकहे सौद्यासाठी खूपच कमी प्रमाणात आंबा उपलब्ध झाला आहे. हंगाम संपत आला तरी अजूनही आवक मंदावलेली आहे. लालबाग, तोतापूरी, मद्रास हापूस, पायरी हा आंबा तूलनेत कमी आल्याचे दिसते. दरातही मागील वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. – जयवंत पाटील (सचिव : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती)
दोन वर्षातील आवक
(क्विंटलमध्ये)
प्रकार 2021-22 2022-23
लालबाग 21702 1517
तोतापूरी 2914 290
मद्रास हापूस 5696 2854
मद्रास पायरी 1733 1120
हापूस 79027 83445
पायरी 5137 1584
तुलनात्मक दर (क्विंटल रुपये)
प्रकार 2021-22 2022-23
लालबाग- 875 575
तोतापूरी- 2250 2500
मद्रास हापूस -1000 1500
मद्रास पायरी- 2500 2750
हापूस- 6000 3500
पायरी- 1000 1250
Previous Articleपौर्णिमेची रात्र,जंगल अन् मचानावरची बैठक
Next Article साताऱ्यात नारायण राणे यांचे चाफ्याचे फुल देऊन स्वागत









